ओबीसी वसतीगृहाकरीता ओबीसी संघटनांचे गोंदियात भीक मांगो आंदोलन
By अंकुश गुंडावार | Updated: September 21, 2023 14:56 IST2023-09-21T14:55:32+5:302023-09-21T14:56:24+5:30
गोळा झालेला निधी मनिआर्डरच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठविला

ओबीसी वसतीगृहाकरीता ओबीसी संघटनांचे गोंदियात भीक मांगो आंदोलन
गोंदिया : मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही.
राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आताही गंभीर नाही. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आज 21 सप्टेंबरला गोंदियातील जयस्तंभ चौक परिसरात भीक मांगो आंदोलन करुन गोळा झालेला निधी मनिआर्डरच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठविला.
शाळा महाविद्यालये सुरू होवून 3 महिने उलटले आहेत तरी 7200 विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृहे, 21600 विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, 75 विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असतांना अजूनही वरील योजना शासनाने सुरू केल्या नाहीत.वरील योजना महाराष्ट्र शासनाच्या वित्त व बहुजन कल्याण विभागाने अडवून ठेवल्या आहेत. चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. 52 टक्क्यांच्या वर असलेल्या कष्टकरी, अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही. शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो आंदोलनाच्या माध्यमातून सरकार साठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष समितीचे अशोक लंजे,कैलास भेलाावे,शिशिर कटरे, सुधीर ब्राम्हणकर, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, युवा बहुजन मंचचे सुुनिल भोंगाडे, पिछडा शोषित संघटनेचे प्रेमलाल साठवणे, मोहसिन खान, उमेश कटरे, रवी भांडारकर, रवी सपाटे महेंद्र बिसेन मुनेश्वर कुकडे, प्रमोद गुडधे, हरिष मोटघरेसह ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी समुहातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.