अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार अर्जुनी मोरगाव-सानगडी मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 18:58 IST2024-08-11T18:58:35+5:302024-08-11T18:58:46+5:30
परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असतो

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार अर्जुनी मोरगाव-सानगडी मार्गावरील घटना
बोंडगावदेवी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अस्वल ठार झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव-सानगडी मार्गावर रविवारी (दि.११) दुपारी घडली.
अर्जुनी मोरगाव ते सानगडी, निमगाव हा परिसर जंगल व्याप्त आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. तर गेल्या काही दिवसांपासून अस्वल आणि एका पट्टेदार वाघाचा वावर आहे.
काही गावकऱ्यांना या अस्वल आणि वाघाचे सुद्धा दर्शन झाले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास अर्जुनी मोरगाव ते सानगडी मार्गावर रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने अस्वलाला जोरदार धडक दिली. यात अस्वलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी लगेच याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
माहिती मिळताच अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. आर. कटरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृत अस्वलाचा पंचनामा केला. मृत अस्वलाचे शवविच्छेदन प्रकाष्ट निष्कासन अधिकारी एस. जी. अवगान यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. समीर शेंद्रे यांनी केले. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर वन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.