ट्रॅक्टरचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी; ८ हजार स्वीकारतांना कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 14:43 IST2022-05-12T14:21:25+5:302022-05-12T14:43:58+5:30
याप्रकरणी तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रॅक्टरचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी; ८ हजार स्वीकारतांना कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
तिरोडा (गोंदिया) : कृषी विभागाच्या योजनेतून शेतकऱ्याला मंजूर झालेला ट्रॅक्टर खरेदी करून त्याच्या अपलोड केलेल्या बिल, पावतीच्या व्यावसायिक परीक्षण रिपोर्टमध्ये त्रुटी काढून ८ हजार रुपये लाच रकमेची मागणी करणाऱ्या कृषी पर्यवेक्षकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
प्रेमानंद पांडुरंग खंडाईत असे लाच स्वीकारणाऱ्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. ही कारवाई ११ मे रोजी तिरोडा बसस्थानकासमोरील चहाच्या टपरीवर करण्यात आली. तिरोडा तालुक्यातील गिरणा येडमाकोट येथील एका शेतकऱ्याच्या नावे असलेल्या शेतीवर कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२१ - २२करिता तक्रारदाराने ऑनलाईन अर्ज केला. त्यानुसार त्यांना ट्रॅक्टर मंजूर झाला.
ट्रॅक्टर खरेदी करून त्याची पावती अपलोड करण्यात आली. त्यानंतर मुंडीकोटा येथील कृषी पर्यवेक्षक खंडाईत याने संबंधित बिले व पावती पाहून व्यावसायिक परीक्षण रिपोर्टमध्ये ट्रॅक्टर त्या नावावरून त्रुटी काढली. ही त्रुटी न करता हा प्रस्ताव मान्य करून शासनाकडे अनुदान रकमेच्या मंजुरीकरिता पाठविण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी १० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ मे रोजी लाच मागणीच्या तक्रारीची योग्य पडताळणी केली. तसेच तिरोडा बसस्थानकासमोर चहाच्या टपरीवर सापळा रचून कृषी पर्यवेक्षक प्रेमानंद पांडुरंग खंडाईत याला पंचासमोर ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदियाचे पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस हवालदार मिल्कीराम पटले, संजय बोहरे, नायक पोलीस शिपाई राजेंद्र बिसेन, मंगेश कहालकर, अशोक कापसे, संतोष बोपचे, चालक दीपक वाटबर्वे यांनी केली.