तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्द येथील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:58 IST2025-06-20T18:57:14+5:302025-06-20T18:58:19+5:30

२०१२ नंतर स्थानिक प्रभाग सदस्यांची निवडच नाही : प्रथमच नगराध्यक्ष व नगरसेवक निवडण्याची संधी

After 13 years, citizens of Amgaon Khurd will exercise their right to vote | तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्द येथील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

After 13 years, citizens of Amgaon Khurd will exercise their right to vote

विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा :
स्थानिक नगरपंचायतीची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असून, या निवडणुकीत या नगरपंचायत क्षेत्रातील आमगाव खुर्द या भागातील नागरिकांना आपला प्रभाग सदस्य निवडून देण्यासाठी तब्बल १३ वर्षानंतर मतदान करण्याची संधी मिळणार आहे. निवडणुकीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापू लागले आहे, तर दुसरीकडे आमगाव खुर्द येथील नागरिकांमध्ये आपला स्थानिक नगरसेवक निवडून देण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.


आमगाव खुर्द ग्रामपंचायतीची शेवटची निवडणूक २०१२ मध्ये घेण्यात आली. त्यानंतर येथील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. परंतु याच दरम्यान २०१५ मध्ये सालेकसा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यात आला. परंतु आमगाव खुर्द ग्रामपंचायत ही तालुक्याच्या ठिकाणी असल्याने आमगाव खुर्दला नगर पंचायतमध्ये समावेश करण्यात यावे, अशी मागणी आमगाव खुर्द येथील नागरिकांनी केली. परंतु २०१७ पर्यंत आमगाव खुर्दचा समावेश नगरपंचायतीत झाला नाही. अखेर निवडणूक आयोगाने २०१७ मध्ये आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक घेण्याची अधिसूचना जारी केले. परंतु आमगाव खुर्द येथील नागरिकांनी नगरपंचायतमध्ये समावेश करण्याची मागणी करीत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे मतदारांना मतदानाची संधी मिळाली नाही.


जि.प. व पं.स. क्षेत्र बदलले
२०२१ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मात्र आता आमगाव खुर्द ग्रा.पं. सालेकसा नगरपंचायतचा भाग झाल्याने आमगाव खुर्दला जि.प. गट आणि पंचायत समिती गणातून वगळण्यात आले, तर तिरखेडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्र तयार करण्यात आले. अशात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतसुद्धा मतदान करण्याची संधी आमगाव खुर्द येथील मतदारांना मिळाली नाही. २०२२ मध्ये सालेकसा नगरपंचायतचा कार्यकाळ संपला. परंतु कार्यकाळ संपल्यानंतर अडीच वर्षे लोटली तरी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही. आता येत्या ऑक्टोबरपर्यंत नगरपंचायत निवडणूक होणार असून, तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्द येथील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध होईल.


संघर्षानंतर २०१८ मध्ये नगरपंचायतमध्ये समावेश
आता आमगाव खुर्द येथे ना ग्रामपंचायत ना नगरपंचायत असे चित्र निर्माण झाले होते. आमगाव खुर्दला नगरपंचायतमध्ये समावेश न करता निवडणूक आयोगाने सालेकसा नगरपंचायतीची निवडणूक घेतली. सत्ता स्थापन झाली, तर इकडे आमगाव खुर्दवासी पोरके झाले होते. अशात येथील नागरिकांनी नगर पंचायतमध्ये सामावून घेण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले. तसेच ग्रामपंचायत सदस्य ब्रजभूषण बैस यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर २०१८ मध्ये आमगाव खुर्दचा नगरपंचायतमध्ये समावेश करण्यात आला. अशात निवडणुका होतील असे वाटले; परंतु सालेकसा नगरपंचायतीचा फक्त एकच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला होता. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली नाही. अशात पुन्हा आमगाव खुर्द येथील मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाली नाही.


"मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आमगाव खुर्दला सालेकसा नगरपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आले. पण गेल्या आठ वर्षांपासून निवडणूक झाली नाही. पण आता लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची संधी मिळेल."
- ब्रजभूषण बैस, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सालेकसा


"आम्ही येथील स्थानिक नागरिक असून, मागील १३ वर्षांपूर्वी मतदान केले होते. तेव्हापासून आम्हाला मतदान करण्याची संधी मिळाली नाही. आता निवडणूक होऊ घातली असून, मतदान करण्याची संधी मिळणार आहे."
- सुनील असाटी, स्थानिक नागरिक, आमगाव खुर्द.

Web Title: After 13 years, citizens of Amgaon Khurd will exercise their right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.