'ऑनलाइन' प्रक्रियेकडे कानाडोळा करणाऱ्या ५७१ शाळांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:04 IST2025-04-03T18:03:52+5:302025-04-03T18:04:33+5:30
शिक्षण विभागांकडून वांरवार सूचना : १० एप्रिलची डेडलाइन

Action will be taken against 571 schools that ignore the 'online' process
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षण विभागाच्या वतीने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासीत आराखड्याअंतर्गत सर्व शाळांनी आपल्या शाळेची 'ऑनलाइन' माहिती भरणे आवश्यक आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील ५७१ शाळांनी आपल्या शाळेची ऑनलाइन माहिती भरली नाही. यासाठी आता १० एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ९७.३२ टक्के शाळांनी ऑनलाइन माहिती भरण्याचे काम सुरू केले आहे. २.६९ टक्के शाळांनी माहिती भरण्यास सुरुवातच केली नाही. ६५.२७ टक्के शाळांची शंभर टक्के माहिती भरण्यात आली आहे. उर्वरित शाळांचे काम सुरू आहे. ही माहिती ऑनलाइन भरण्यासाठी आता १० एप्रिलपर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे. शाळांनी पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी केल्यानंतर शाळेची संपूर्ण १२८ मानकाची माहिती भरणे आवश्यक आहे. शाळेची गुणवत्ता वाढावी, शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शाळेचा एकूणच शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी 'स्कॉफ' या आराखड्याअंतर्गत माहिती भरली जात आहे. शाळांनी या आराखड्याअंतर्गत संपूर्ण माहिती भरून स्वयंमूल्यमापन केल्यानंतर बाह्यमूल्यमापन केले जाणार आहे. त्यानंतर शाळेचा दर्जा ठरविला जाणार आहे. बाह्य मूल्यमापन प्राथमिक शाळेसाठी ४५२ गुणांचे राहणार असून, माध्यमिक शाळेसाठी जवळपास ५०० गुणांचे राहणार आहे. १२८ मानकांपैकी ११३ मानकांची माहिती भरणे बंधनकारक आहे.
सर्व माहिती मानकात भरावी लागणार
मैदानी खेळ, गणित विज्ञान मंडळ, वाचन विभाग, गणित साक्षरता मंडळ, कृती आधारित अध्यापन फोटो, शिक्षकांनी घेतलेले प्रशिक्षण, गुणवत्ता सुधारण्याकरिता नावीन्यपूर्ण प्रकल्प, वाचन कोपरा फोटो आदी सर्व माहिती शाळांना १२८ मानकांत भरावी लागणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सर्व टप्प्यांसाठी खासगी व शासकीय शाळांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृती करण्यासाठी गुणवत्ता मानके निश्चित करून शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा हे मार्गदर्शक साधन विकसित करण्यात आले आहे. हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी होणार
शाळांनी स्वयंमूल्यमापन केल्यानंतर त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी होणार आहे. या तपासणीत १५ टक्क्यांपेक्षा जास्त तफावत असू नये. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याअंतर्गत शाळांना शाळेमध्ये झालेली चर्चासत्रे, पालक सभा, वार्षिक नियोजन, ऑनलाइन अभ्यास, विद्यार्थी अभ्यास करतानाचा फोटो, अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठ टाचण, समग्र प्रगतिपत्रक, वृक्षारोपण, क्षेत्रभेट आदी साहित्य वापरतानाचा फोटो, किशोरवयीन विद्यार्थ्यांची कार्यशाळा, सर्व वर्गाचे वेळापत्रक फोटो, तसेच कला, संगीत व नृत्य नाटकाचा समावेश राहणार आहे.
"५७१ शाळांनी १० एप्रिलपर्यंत शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याअंतर्गत आपल्या शाळेची सर्व माहिती ऑनलाइन भरून घ्यावी. काही अडचण असल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा."
- सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी प्राथमिक