कर्जबाजारीपणाला कंटाळून गोंदियातील शेतकऱ्याने संपवले जीवन
By अंकुश गुंडावार | Updated: July 30, 2025 17:22 IST2025-07-30T17:21:21+5:302025-07-30T17:22:30+5:30
Gondia : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना

A farmer in Gondia ended his life due to debt.
देवरी (गोंदिया) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.३०) सकाळी तालुक्यातील चिचगड पोलिस हद्दीतील डोंगरगाव सुंदरी येथे उघडकीस आली. गजानन अंताराम वारई (वय ४७) असे गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
देवरी तालुक्यातील डोंगरगाव सुंदरी येथील गजानन वारई हे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर असलेले कर्ज आणि सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त होते. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास ते घरुन बाहेर गेले होते. सायंकाळी ते घरी परत न आल्याने कुटूंबियांनी त्याची आजूबाजूच्या गावात शोधाशोध केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. बुधवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास गजानन वारई यांचा मृतदेह शेत शिवारालगत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. काही नागरिक या परिसरात गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी लगेच याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना व पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा अशा आप्त परिवार आहे.