दुर्दैवी! तलावात बुडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; खेळताना घडला प्रकार
By कपिल केकत | Updated: September 22, 2022 14:51 IST2022-09-22T14:23:19+5:302022-09-22T14:51:44+5:30
छोटा गोंदिया परिसरातील घटना; अग्निशमन पथकाने तलावातून मृतदेह बाहेर काढला

दुर्दैवी! तलावात बुडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; खेळताना घडला प्रकार
गोंदिया : परिसरातील मुलांसोबत खेळता- खेळता पाय घसरून तलावात पडल्याने ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळील तलावात गुरुवारी (दि.२२) दुपारी १२ वाजतादरम्यान ही घटना घडली.
कुंजू लुकेश पटले (३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कुंजू हा परिसरातील लहान मुलांसोबत खेळत असताना त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सोबत खेळत असलेल्या मुलांमध्ये गोंधळ उडाला. यातील एका मुलीने त्याच्या घरी जाऊन सदर घटना सांगितली, घरच्यांनी लगेच अग्निशमन पथकाला माहिती दिली.
अग्निशमन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुंजूला लगेच तलावातून बाहेर काढले व डॉ. गिरी यांच्या हॉस्पीटलमध्ये नेले. मात्र त्यांनी डॉ. आरती पटले यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. डॉ. पटले यांच्या दवाखान्यात नेले असता त्यांनी तपासणी करून कुंजूला मृत घोषित केले.