जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच फार्मर आयडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:18 IST2025-03-08T17:17:42+5:302025-03-08T17:18:20+5:30
दीड लाखावर शेतकऱ्यांची नोंदणी : फार्मर आयडीच्या प्रक्रियेला वेग

93 thousand farmers in the district will soon get Farmer ID
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतजमिनी आधारशी संलग्नित करणे, शेतीविषयक विविध योजना, पीककर्ज, खरेदी-विक्री व्यवहार नोंदणी आदी कामे पेपरलेस म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने सुकर करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना कार्यान्वित केली आहे. जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार ५५९ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून यापैकी ९३ हजार शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली असून ते आयडीकरिता पात्र ठरले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सुरुवातीला अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्यानंतर याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर आता शेतकरी नोंदणीसाठी लगबग करीत आहेत. योजनेअंतर्गत जर अपेक्षित कालावधीत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पार पडली. तर संबंधित शेतकऱ्यांच्या आधार नंबरला फार्मर आयडी युनिक कोड संलग्नित केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात विविध शेतीविषयक कामासाठी ऑफलाइन कागदपत्रे काढावी लागणार नाहीत. कृषी संबंधित कोणतीही कामे करून घेण्यासाठी फार्मर आयडी कार्डवरील शेतकऱ्यांचा युनिक कोड ऑनलाइन प्रणालीवर टाकला की आवश्यक ती कामे एका कोड नंबरवरच केली जातील. ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र राज्यात लवकरच कार्यान्वित करता यावी. यासाठी अॅग्रीस्टॅक योजना गतिमान व्हावी म्हणून शासनाने जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले. योजनेची सखोल माहिती सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाच्यावतीने जनजागृती व प्रसिद्धीसाठी काही निधीही प्राप्त करून दिला आहे.
फार्मर आयडी पडणार विविध कामासाठी उपयोगी
अॅग्रीस्टॅक योजनेतंर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध करुन दिली जात आहे. पुढे याच फार्मर आयडीच्या आधारावर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी पडणार असून सर्व शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे.
२४ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील १ लाख ४६ हजार ५५९ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी केली. त्यातील ९३ हजार शेतकऱ्यांची पडताळणीही पूर्ण झाली असून यापैकी २२ हजार ९२४ शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आली. ९३ हजार २७८ शेतकऱ्यांची पडताळणी अद्यापही शिल्लक असून २४ हजार २२७ शेतकरी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
अॅपवरून नोंदणीला प्रतिसाद कमी
अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सर्वच शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी खासगी संस्थांसह मोबाइलवर अॅपदेखील विकसित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांनी मोबाइलवरून नोंदणी केली. यात आमगाव तालुक्यातील १५. अर्जुनी मोरगाव २, देवरी १, गोंदिया ५, गोरेगाव १, सालेकसा २१ आणि तिरोडा तालुक्यातील ५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
फार्मर आयडीसाठी नोंदणी केलेले शेतकरी
तालुका एकूण नोंदणी मंजूर अर्ज
आमगाव १९१३५ ७५००
अर्जुनी मोर. २३१२४ १४१७८
देवरी १७०७४ ७३३५
गोंदिया ४०७७५ २२०२१
गोरेगाव १९९१४ १११३२
सडक अर्जुनी १९९८१ १११३२
सालेकसा १४६३९ ४७१६
तिरोडा ३१९१७ १९५६७