मतदान कमी होता कामा नये!: बी.एल.संतोष; कोअर टीमसह आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 12:54 PM2024-04-26T12:54:04+5:302024-04-26T12:57:36+5:30

८० टक्के मते आणण्याचे 'टार्गेट' याआधीच आमदारांना देण्यात आलेले आहे.

voting should not be low bl santosh instructions to mla office bearers along with core team | मतदान कमी होता कामा नये!: बी.एल.संतोष; कोअर टीमसह आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना

मतदान कमी होता कामा नये!: बी.एल.संतोष; कोअर टीमसह आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काहीही करा मात्र मतदान कमी होता कामा नये, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचा, त्यांना मतदानासाठी घराबाहेर काढा. त्याचबरोबर भाजप उमेदवारांचे मताधिक्य वाढवा, अशी ताकीद भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी काल पक्षाच्या कोअर टीमसह दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आमदार, मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

८० टक्के मते आणण्याचे 'टार्गेट' याआधीच आमदारांना देण्यात आलेले आहे. मते कमी होऊ शकतील, असा अंदाज असलेल्या भागांमध्ये काम वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. गोव्याच्या धावत्या दौऱ्यावर आलेले बी. एल. संतोष यांनी काल सकाळी म्हापसा येथे उत्तर गोवा मतदारसंघातील भाजप आमदार, मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत कसे मतदान झाले होते? आता काय स्थिती आहे? व किती मते मिळू शकतात? याचा अंदाज त्यांनी आढावा बैठकीत घेतला. त्यानंतर दुपारी येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात कोअर कमिटीची बैठक झाली. त्यातही त्यांनी मार्गदर्शन केले. नंतर दक्षिण गोवा मतदारसंघातील आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक मडगाव येथे घेतली. 

शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे मतदानावर परिणाम होणार नाही, हे पाहा. दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकायच्या आहेत. मतदारांनी निवडणुकीच्या दिवशी सहली वगैरे आयोजित केल्या असतील तर त्या रद्द करण्यास सांगा, असा सल्ला त्यांनी दिला. तिन्ही बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींवरही चर्चा करण्यात आली.

तिन्ही बैठकांमध्ये आढावा: तानावडे

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, बी. एल. संतोष यांनी तिन्ही बैठकांमध्ये आढावा घेऊन काही गोष्टी जाणून घेतल्या. आम्ही निवडणुकीसाठी पूर्ण तयारीने सज्ज आहोत. दोन्ही जागांवर शंभर टक्के विजयाची खात्री आम्ही त्यांना दिलेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी राज्य घटनेचा अनादर केलेल्या कथित विधानाचे समर्थन करून तानावडे यांच्यावर केलेल्या शरसंधानाचा तानावडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, पाटकर यांनी मला घटनेविषयी शिकवू नये. त्यांनी आधी काँग्रेस पक्षात जे अंतर्गत राजकारण चालले आहे, त्याकडे लक्ष द्यावे.

शाह यांची सभा १ ते ३ मे दरम्यान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची म्हापशातील २४ रोजीची पुढे ढकललेली जाहीर सभा आता १ ते ३ मे यादरम्यान होईल, असे तानावडे यांनी सांगितले. सांकवाळ येथे २७ रोजी होणार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे, असे ते म्हणाले.
 

Web Title: voting should not be low bl santosh instructions to mla office bearers along with core team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.