धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या - गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांचे आवाहन  

By किशोर कुबल | Published: April 17, 2024 05:10 PM2024-04-17T17:10:34+5:302024-04-17T17:12:24+5:30

गोव्यात जवळपास २७ टक्के ख्रिस्ती बांधव आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा चर्च संस्थेचा प्रभाव कायम राहिला आहे.

Vote for Secular Candidates - Archbishop of Goa, Daman and Diu Cardinal Philip Neri Ferraon appeals | धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या - गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांचे आवाहन  

धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या - गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांचे आवाहन  

पणजी : जे खरोखरच सर्व लोकांच्या भल्यासाठी आणि आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांचे पालन करण्यास वचनबद्ध आहेत अशा धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या, असे आवाहन गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी ख्रिस्ती बांधवांना केले आहे.

गोव्यात जवळपास २७ टक्के ख्रिस्ती बांधव आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा चर्च संस्थेचा प्रभाव कायम राहिला आहे. दक्षिण गोव्यात सासष्टी तालुक्यात तर ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय असून तेथे प्रत्येक निवडणुकीत ख्रिस्ती मतेंच निर्णायक ठरत असतात. या अनुषंगाने कार्डीनलनी केलेल्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

कार्डीनल फिलीप नेरी फेर्रांव यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे कि,‘ लोक धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मतदान करुन संविधानातील मूल्यांचे पालन करतील.
६ मे रोजी मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली वालंकनीला जाण्यासाठी गोव्यातील भाविकांची ट्रेन सुटणार आहे. कार्डीनल फेर्रांव यांनी या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी ७ मे रोजी सुट्टीच्या योजना किंवा तीर्थयात्रा आयोजित करु नये. त्याऐवजी मतदानाला प्राधान्य देऊन आपला हक्क बजावावा, असे आवाहन केले आहे. ते म्हणाले की,‘ प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे. केवळ हक्क म्हणून नव्हे तर देशाप्रती कर्तव्य म्हणून मतदान करावे.’ असे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या यशासाठी ३ किेंवा ५ मे रोजी चर्चेसमध्ये प्रार्थनाही आयोजित केल्या जाणार आहेत.

कार्डिनल पुढे म्हणाले की, ‘आम्ही सामूहिकपणे हे लक्षात ठेवायला हवे की, आपले मत हे आपल्या देशाच्या भल्यासाठी असावे. देशाचा विकास हा तेथील नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आणि जबाबदार वर्तनावर अवलंबून असतो.’

कार्डीनल पुढे म्हणाले कि, ७ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी न होणे म्हणजे  जबाबदारीपासून दूर राहणे होय. त्यामुळे केवळ राष्ट्राचेच नुकसान होणार नाही तर जबाबदारी निभावण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही येईल.

दरम्यान, भाजपने गोव्यातील दोन्ही जागांवर हिंदू उमेदवार दिले आहेत तर कॉग्रेसने इंडिया आघाडीसाठी दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडिस यांच्या रुपाने ख्रिस्ती उमेदवार दिला आहे

Web Title: Vote for Secular Candidates - Archbishop of Goa, Daman and Diu Cardinal Philip Neri Ferraon appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.