उत्तरेत खलप, दक्षिणेतून विरियातो? काँग्रेसची अजून खलबतेच; पाटकर, युरींशी चर्चेअंती निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2024 08:19 IST2024-04-06T08:19:10+5:302024-04-06T08:19:56+5:30
भाजपने गोव्यातील आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले तरी काँग्रेसमध्ये तिकिटाबाबतचा गुंता सुटत नव्हता.

उत्तरेत खलप, दक्षिणेतून विरियातो? काँग्रेसची अजून खलबतेच; पाटकर, युरींशी चर्चेअंती निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काँग्रेसने अखेर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात अॅड. रमाकांत खलप व दक्षिण गोव्यात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी जवळजवळ केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस वेणुगोपाल, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी गोव्यातून गेलेले प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची बैठक घेऊन चर्चा केली व त्यानंतरच नावे निश्चित केल्याचे कळते.
कॅप्टन विरियातो फर्नांडिस लोकसभेसाठी दक्षिणेत नवीन चेहरा असला तरी २०२२ ची विधानसभा निवडणूक त्यांनी दाबोळी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. माविन यांच्याकडून त्यांना १५७० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यांनी आपले काम चालूच ठेवले. सरकारविरोधात पत्रकार परिषदा घेऊन अनेक विषयांचा भांडाफोड त्यांनी केला आहे. सरंक्षण दलातील ते निवृत्त अधिकारी असून त्यांनी गोवा विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी तसेच बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदविका घेतलेली आहे.
खलप १९९० च्या दशकात केंद्रात कायदामंत्री होते. या खात्याचा त्यांच्याकडे स्वतंत्र कारभार होता. देवेगौडा पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात व नंतर इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात त्यानी काम केले आहे.
भाजपने गोव्यातील आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले तरी काँग्रेसमध्ये तिकिटाबाबतचा गुंता सुटत नव्हता. उमेदवारांच्या नावांबाबत स्थानिक नेते व केंद्रीय नेते यांच्यात ताळमेळ बसत नव्हता. पक्षात अंतर्गत गटबाजीनेही डोकेवर काढले होते. उत्तर गोव्यात हिंदू आणि दक्षिण गोव्यात ख्रिस्ती उमेदवार देण्याची परंपरा काँग्रेसने कायम ठेवली असल्याची माहिती मिळते.