‘कमळ’ निशाणी हाच आमचा उमेदवार: सदानंद शेट तानावडे; पुरुष किंवा महिलेला तिकीट दिली तरी काहीच फरक पडणार नाही
By किशोर कुबल | Updated: March 19, 2024 14:01 IST2024-03-19T14:01:11+5:302024-03-19T14:01:46+5:30
राहुल गांधींनी इंडिया अलायन्सच्या सभेत ‘शक्ती’संबंधी केलेल्या विधानाचा तानावडे यांनी निषेध केला.

‘कमळ’ निशाणी हाच आमचा उमेदवार: सदानंद शेट तानावडे; पुरुष किंवा महिलेला तिकीट दिली तरी काहीच फरक पडणार नाही
किशोर कुबल, पणजी : ‘आमच्यासाठी कमळ निशाणी हाच आमचा उमेदवार, श्रेष्ठींनी दक्षिण गोव्यात पुरुष उमेदवार दिला किंवा महिला, आम्हाला काहीच फरक पडणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्याबद्दल प्रश्न केला असता ते म्हणाले की, आज मंगळवारी किंवा जास्तीत जास्त उद्या बुधवारपर्यंत आमचा दक्षिणेतील उमेदवार जाहीर होईल. श्रेष्ठी जो उमेदवार देतील त्या व्यक्तीला निवडून आणण्यास भाजप नेते सक्षम आहेत.
तानावडे पुढे म्हणाले कि,‘उमेदवार जाहीर झालेला नाही म्हणून आमचे काम काही थांबलेले नाही. दक्षिण गोव्यात आतापर्यंत आमच्या १४ जाहीर सभा झालेल्या आहेत. परवा मुरगांवमध्ये ३ हजार महिलांचा मेळावा झाला. आज किंवा उद्या उमेदवार जाहीर होऊन आठ दिवसात सर्वत्र प्रचार कार्यालयेही उघडली जातील.’
एसटी बांधवांनी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याचा जो इशारा दिला आहे. त्याबद्दल विचारले असता तानावडे यांनी एसटी समाज भाजपसोबतच असल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वी काणकोणात झालेल्या सभेत समाजाच्या नेत्यांनी भाग घेऊन भाजपला साथ दिली आहे.’
राहुल गांधीच्या विधानाचा निषेध
राहुल गांधींनी इंडिया अलायन्सच्या सभेत ‘शक्ती’संबंधी केलेल्या विधानाचा तानावडे यांनी निषेध केला ते म्हणाले की,‘ नारीशक्तीचा हा अपमान आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी नारीशक्तीचा महिमा राहुल गांधींना कळेल.’