शक्तिप्रदर्शनातून काँग्रेसचेही प्रत्युत्तर; इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 09:27 AM2024-04-18T09:27:25+5:302024-04-18T09:28:32+5:30

खलप व पत्नीची मालमत्ता १६.७५ कोटी

congress also responded with a show of strength applications filed by congress india alliance candidates for goa lok sabha election 2024 | शक्तिप्रदर्शनातून काँग्रेसचेही प्रत्युत्तर; इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

शक्तिप्रदर्शनातून काँग्रेसचेही प्रत्युत्तर; इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नाडिस यांनी काल आपले उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसनेही जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपला प्रत्युत्तर दिले.

रमाकांत खलप यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी २ वाजता अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्ल्स फेरेरा, आपचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर आदी उपस्थित होते.

काँग्रेस भवनाजवळ कार्यकर्ते जमले व खलप यांना मिरवणुकीने जवळच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. खलप यांनी निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.

दरम्यान, सकाळी दक्षिण गोवा मतदारसंघात विरियातो फर्नाडिस यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्यासोबतही मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. विरियातो यांचा अर्ज भरताना युरी आलेमाव, अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आपचे आमदार वेंझी व्हिएगश आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खलप पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'गेल्या २५ वर्षात गोव्याचा आवाज लोकसभेत पोहोचलाच नाही. आजवर एवढ्या निवडणुका मी लढवल्या; परंतु कार्यकर्त्यांचा आज जो उत्साह आहे, तसा पूर्वी कधी दिसला नाही. मी आजही तेवढाच सक्रिय आहे. सर्व जाती, धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. कार्यकर्त्यांच्या जीवावार मी गड सर करणार.' दरम्यान, खलप म्हणाले की, 'ढवळीकर यांनी मगोपच्या एकातरी ध्येय- धोरणाचे पालन केले आहे का हे दाखवून द्यावे. कूळ कायद्याची अंमलबजावणी हे सरकार करू शकलेले नाही.'

खलप अर्ज भरून बाहेर पडताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून खलप यांना पुष्पहारही घातले. खलपांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. काँग्रेसचे फायरब्रॅण्ड युवा नेते जनार्दन भंडारी, उत्तरेतून तिकिटासाठी पक्षाकडे अर्ज केलेले खेमलो सावंत, मांद्रेचे गटाध्यक्ष नारायण रेडकर, मांद्रे मतदारसंघातील काही आजी- माजी सरपंच, पंच याप्रसंगी उपस्थित होते.

रमाकांत खलप यांची मालमत्ता

माजी केंद्रीय कायदामंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांची स्वतःची मालमत्ता ६.२२ कोटी रुपयांची तर पत्नी निर्मला यांच्या नावे ११.५३ कोटींची आहे. काल बुधवारी उत्तर गोवा मतदारसंघातून अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे.

एकूण मालमत्ता : १६,७५ कोटी
बँक ठेवी : ३ कोटी ४७ लाख
कायम ठेवी : ७७ लाख रुपये
स्थावर मालमत्ता : ६,६१,५३,०००
कृषी जमीन : १ कोटी २९ लाख
दागिने : ३,६६६ ग्रॅम, मूल्य : २,४५,६३,५४०

खलप यांनी स्वतःच्या नावे एकीकडे २ कोटी ८४ लाख रुपयांची तर दुसरीकडे ६३ लाख रुपयांची तसेच पत्नीच्या नावे ६ कोटी ६१ लाख ५३ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. बाजारभावानुसार १ कोटी २९ लाख रुपये. किमतीची कृषी जमीन त्यांनी दाखविली आहे. खलप यांनी मुंबई विद्यापीठात बीएससी तर धारवाड विद्यापीठात एलएलबी पदवी घेतली आहे.

विरियातो यांची मालमत्ता ५.६७ कोटी

काँग्रेसचे दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार, कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांची एकूण १.९७ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची पत्नी अनिता यांची मालमत्ता त्यांच्यापेक्षाही जास्त असून त्यांच्याकडे ३.७० कोटींची मालमत्ता आहे. दोघांची एकूण मालमत्ता ५.६७ कोटी रुपये आहे.

एकूण मालमत्ता : ५.६७ कोटी
कर्ज : १ लाख ९८ हजार
स्थावर मालमत्ता : १ कोटी ७३ लाख
मोटारी: तीन (२४.५० लाख रुपये)
दागिने : १९ लाख ३१ हजार रुपये
रोकड : ७९ हजार रुपये
शेअर बाजार गुंतवणूक: २ कोटी ६४ लाख

एका गुन्ह्याची नोंद

विरियातो यांच्यावर एक ५ गुन्हाही नोंद आहे. रेल्वे मार्ग दुपदरीकरणास केलेल्या विरोधाबाबतचा हा गुन्हा असून तो मायणा- कुडतरी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात यासंबंधी खटला चालू आहे.

तेव्हा कारवाई का केली नाही? : खलपांचा सवाल

म्हापसा अर्बन बँकेच्या प्रकरणात मंत्री सुदिन ढवळीकर यांनी खलपांना जबाबदार धरत आरोप केले होते. त्याबद्दल विचारले असता खलप म्हणाले की, 'ढवळीकर त्यावेळी मंत्री होते व त्यांच्याकडे जर पुरावे होते तर त्याचवेळी माझ्यावर कारवाई करून त्यांनी बैंक का वाचवली नाही? कोणीतरी फूस लावतो व ढवळीकर बोलत सुटले आहेत.'

 

Web Title: congress also responded with a show of strength applications filed by congress india alliance candidates for goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.