राज्यातील प्रत्येकाशी भाजप वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करील: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2025 08:18 IST2025-01-12T08:16:42+5:302025-01-12T08:18:56+5:30
दक्षिण गोवा जिल्हा भाजप अध्यक्षपदी प्रभाकर गावकर

राज्यातील प्रत्येकाशी भाजप वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करील: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भाजप स्वयंसेवकांनी भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व लोकांपर्यंत वैयक्तिकरीत्या पोहोचण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. शनिवारी प्रभाकर गावकर यांची दक्षिण गोवा जिल्हा भाजप अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा मडगाव भाजप दक्षिण गोवा कार्यालयात करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, सभापती रमेश तवडकर, भाजप नेते दिगंबर कामत, बाबू कवळेकर, नीलेश काब्राल, बाबू आजगावकर, नरेंद्र सावईकर, दामू नाईक, कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "दक्षिण गोवा भाजपचे नवे अध्यक्ष म्हणून प्रभाकर गावकर यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. गावकर हे २५ वर्षांपासून भाजप पक्षासाठी कार्यरत आहेत. आपल्या मेहनतीमुळे ते उच्च पदावर पोहोचले आहेत. जिल्हा पंचायत, विधानसभा, पंचायत, नगरपालिका, लोकसभा या निवडणुकांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व निवडणुका लक्षात घेता दक्षिण गोव्यात त्यांना अधिक मेहनत करावी लागणार आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार विजयी होत आहेत त्या मतदारसंघात काम करणे एखाद्याला सोपे असते, मात्र काही मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. १९९४ मध्ये आमचे चार आमदार होते, पण गेल्या तीस वर्षांत आमची संख्या वाढली आहे. विरोधी पक्ष म्हणूनही भाजपने सक्षमपणे काम केले आहे. भाजपने पायाभूत सुविधांचा विकास आणि मानव विकास केला आहे. जनतेने आणि भाजपच्या स्वयंसेवकांनी विरोधकांनी पसरवलेल्या नकारात्मक गोष्टींचा त्रास न करून घेता भाजपसाठी काम करत राहिले पाहिजे.
२०२२ च्या निवडणुकीत पेडणे ते काणकोणपर्यंत जो उत्साह होता, तोच उत्साह २०२७ च्या निवडणुकीत दिसायला हवा, असेही सावंत यांनी नमूद केले. आम्ही आता शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी काही विरोधी नेत्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांना अडचणीत आणण्याचा जर प्रयत्न केला, तर ते भाजप जिल्हाध्यक्षांशी सहज संपर्क साधू शकतात. एका व्यक्तीने भाजप नेत्यावर काही गंभीर आरोप केले होते आणि मानहानीचा खटला दाखल झाल्यानंतर आता ती व्यक्ती गप्प झाली आहे.
यावेळी, नवनिर्वाचित दक्षिण गोवा जिल्हा भाजप अध्यक्ष प्रभाकर गावकर म्हणाले की, भाजपमध्ये कोणताही शॉर्टकट नाही. मी २००३ पासून भाजपसाठी काम करत आहे. आधी बूथ प्रमुख झालो आणि नंतर दोनदा एसटी मोर्चा अध्यक्ष झालो. आता माझ्याकडे दक्षिण गोवा जिल्हा भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकांच्या पाठिंब्याने जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
अध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, आम्हाला निवडणूक प्रक्रियेत आमच्या मतदारांचा सहभाग हवा आहे. गोव्यात भाजपचे चार लाख पंचवीस हजार सदस्य करण्यात आम्ही यशस्वी झालो. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कामाला सुरुवात केली आहे. गोव्यातील भाजप स्वयंसेवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. देशात भाजपचा प्रभाव वाढू लागला आहे.
तानावडे म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यास राज्यघटना बदलेल, असा अपप्रचार काँग्रेस पक्षाने सुरू केला होतो, परंतु तसे झाले नाही. २०२७ च्या निवडणुकीत अधिक जागा जिंकण्याचे आम्ही लक्ष्य ठेवले पाहिजे. पुढच्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल, असा मला विश्वास आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे आपले कर्तव्य असून आपण जनतेशी संपर्क वाढवून जनतेशी नाते निर्माण करणे गरजेचे आहे.