दक्षिणेबाबत काँग्रेसच्या निर्णयाकडे भाजपचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2024 08:05 IST2024-04-06T08:03:16+5:302024-04-06T08:05:22+5:30
'इंडिया'चा उमेदवार जाहीर केल्यानंतरच रंगत येणार

दक्षिणेबाबत काँग्रेसच्या निर्णयाकडे भाजपचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: काँग्रेसने अजून आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कोणाला तिकीट देते, याकडे भाजपचेही लक्ष लागून राहिले आहे.
भाजपने पल्लवी धंपे यांच्या रूपाने महिला उमेदवार दिल्याने काँग्रेस दक्षिणेत हिंदू उमेदवार द्यावा की ख्रिस्ती या द्विधा मनःस्थितीत आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये खरी लढत दक्षिण गोव्यातील जागेसाठी होणार असून इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर केल्यानंतरच रंगत येणार आहे. काँग्रेसच्या तिकिटासाठी विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व विरियातो फर्नाडिस अशा दोन ख्रिस्ती आणि एक हिंदू दावेदारांमध्ये स्पर्धा आहे.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. नावेली, कुडतरी, बाणावली, नुवें, वेळ्ळी, कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघांमध्ये नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. भाजपने नुवेंचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देऊन ही मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
१९९९ मध्ये भाजपने खरे तर दक्षिण गोव्याची जागा काँग्रेसकडून हिसकावून घेतली होती. रमाकांत आंगले भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. त्यांना २,१८,८५१ मते मिळाली, तर त्यावेळचे काँग्रेसी उमेदवार ज्योकीम आलेमांव यांचा त्यांनी १४,४५७ मतांनी पराभव केला. हिंदू उमेदवार या मतदारसंघात निवडून आला.
२०१४ मध्ये अॅड. नरेंद्र सावईकर या मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर निवडून आले तेव्हा त्यांना ४८.४४ टक्के मते मिळाली. तर, काँग्रेसच्या मतांचा वाटा २००९ मधील ४६.८८ टक्क्यांवरून २०१४ मध्ये ४०.५६ टक्क्यांवर घसरला. २०१४ मध्ये सावईकर यांनी काँग्रेसी उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड यांचा सुमारे ३२ हजार मतांनी पराभव केला. सावईकर यांना दक्षिणेतील १४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी पर्रीकर सरकार सत्तेवर होते. काँग्रेसला फक्त ६ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती व हे सर्व सहाही मतदारसंघ सासष्टी तालुक्यातील होते.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. सासष्टीत ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. फोंडा, मुरगांव, केपें, सांगे व काणकोण तालुक्यांमध्ये भाजपला मताधिक्य मिळाले होते.
विशेषतः खाणपट्ट्यात त्यावेळी भाजपला मते मिळाली होती. २०१२ मध्ये नुकत्या कुठे खाणी बंद झाल्या होत्या व भाजपने लोकांना खाणी सुरू करू, असे आश्वासन दिले होते. आघाडीमुळे भाजपला त्यावेळी काँग्रेसवर सहज विजय मिळवता आला व सावईकर विजयी ठरले. मतदारांनी पुन्हा हिंदू खासदार दिला.