उत्तर गोव्यात ५ लाख ७७ हजार मतदार: ८६३ पोलिंग स्टेशन , २० पिंक व ४३ मॉडेल स्टेशनचा समावेश
By पूजा प्रभूगावकर | Updated: March 18, 2024 17:19 IST2024-03-18T17:19:16+5:302024-03-18T17:19:52+5:30
लोकसभा निवडणूकीसाठी उत्तर गोव्यात ५ लाख ७७ हजार ९७७ मतदार आहे.

उत्तर गोव्यात ५ लाख ७७ हजार मतदार: ८६३ पोलिंग स्टेशन , २० पिंक व ४३ मॉडेल स्टेशनचा समावेश
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: लोकसभा निवडणूकीसाठी उत्तर गोव्यात ५ लाख ७७ हजार ९७७ मतदार आहे. एकूण ८६३ पोलिंग स्टेशन असून त्यापैकी २० पिंक स्टेशन, ४३ मॉडेल स्टेशनचा समावेश असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उत्तर गोव्यातील एकूण मतदारांमध्ये २ लाख २६० पुरुष व २ लाख ९७ हजार २६० महिला मतदार, ३ तृतीयपंथी व ४ हजार ९५५ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. याशिवाय निवडणूकीसाठी खास दिव्यांग मतदारांसाठी पाच पोलिंग स्टेशन व ४० ग्रीन पोलिंग स्टेशनचा समावेश असेल त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले, की निवडणूकीत पैसा व सत्तेचा वापर होऊ नये यासाठी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी उत्तर गोव्यात २३ भरारी पथक व १६ देखरेख पथकांची नियुक्ती केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे जर कुणाला आढळून आल्यास ते त्याची तक्रार ॲपवर करु शकतात. तक्रार केल्यानंतर त्याची त्वरित कारवाई केली जाईल. ८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जर मतदान केंद्रा पर्यंत मतदान करण्यासाठी जाणे जमत नसल्यास ते पोस्ट बॅलेटव्दारे मतदान करु शकतात त्यांनी सांगितले.