रानटी हत्तींचे अपडाऊन सुरूच! दिवसा गडचिरोली तर रात्री गोंदियात, वन विभाग त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 16:37 IST2022-10-19T16:35:06+5:302022-10-19T16:37:22+5:30
दिवसभर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात तर रात्र होताच सीमा ओलांडून गोंदिया जिल्ह्यात जात आहेत. हत्तींच्या या अपडाऊनमुळे वनकर्मचारी त्रस्त झाले आहेत.

रानटी हत्तींचे अपडाऊन सुरूच! दिवसा गडचिरोली तर रात्री गोंदियात, वन विभाग त्रस्त
गडचिरोली : गोंदिया जिल्ह्यात गेलेल्या रानटी हत्तींचा कळप पुन्हा गुरुवारला रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनविभागात दाखल झाला होता. येथे येताच हत्तींनी कुरखेडा वनपरिक्षेत्रातील चारभट्टी व सिंदेसूर गाव परिसरातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वनविभागाद्वारे रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चमू तयार करण्यात आली. मात्र आता हत्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अपडाऊन करीत आहेत. दिवसभर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात तर रात्र होताच सीमा ओलांडून गोंदिया जिल्ह्यात जात आहेत. हत्तींच्या या अपडाऊनमुळे वनकर्मचारी त्रस्त झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी रानटी हत्तींचा कळप छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला होता. येथे आल्यानंतर हत्तींनी गडचिरोली व वडसा वनविभागातील धानपीक तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. सर्वाधिक नुकसान वडसा वनविभागातील शेतकरी व नागरिकांचे झाले आहे. वडसा वनविभागात धुडगूस घातल्यानंतर रानटी हत्तींचा कळप नजीकच्या गोंदिया जिल्ह्यात पोहोचला. येथे जवळपास १५ दिवस राहिल्यानंतर गुरुवारला पुन्हा हत्तींचा कळप वडसा वनविभागातील कुरखेडा वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे.
कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी व सिंदेसूर गावातील धान पिकांचे हत्तींनी नुकसान केले. वनविभागाने सतर्क होत शुक्रवारला अधिकारी, वनकर्मचाऱ्यांची चमू गठित केली. गस्ती पथकासोबत ग्रामस्थही रात्रभर पहारा देत आहेत. मात्र रानटी हत्तींचा कळप एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अपडाऊन करीत असल्याने वनविभागाचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.