गडचिरोलीतील डॉक्टरांचा आदर्श उपक्रम; घनदाट जंगलात पोहोचून दिली दुर्गम भागात आरोग्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 14:55 IST2022-05-05T14:53:09+5:302022-05-05T14:55:37+5:30
याच वर्षी नाही तर गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा या गावात अशा पद्धतीने ते आरोग्य सेवा देत आहेत.

गडचिरोलीतील डॉक्टरांचा आदर्श उपक्रम; घनदाट जंगलात पोहोचून दिली दुर्गम भागात आरोग्य सेवा
गडचिरोली : ज्या दुर्गम भागातील नागरिकांना खाण्यासाठी अन्न मिळणेही कठीण आहे, तिथे आरोग्य सुविधा कशी पोहोचणार? पण गडचिरोलीतीलडॉक्टरांनी सामाजिक बांधीलकी जोपासत त्यांच्यापर्यंत विमामूल्य आरोग्य सेवा पोहोचविली. केवळ तपासणी आणि रोगनिदानच नाही तर शक्य तो उपचार आणि औषधोपचारही केले. शहरातील खासगी डॉक्टरांचा हा स्तुत्य उपक्रम आदर्श ठरला आहे.
शहरातील वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दुर्गम भागात सेवा देण्याचा विडा उचलला. महाराष्ट्रदिनी हा योग जुळवून आणला. याच वर्षी नाही तर गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा या गावात अशा पद्धतीने ते आरोग्य सेवा देत आहेत. आरोग्य सेवेसोबत त्या लोकांना मायेने दोन घास भरवून आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत, हा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी संपूर्ण आरोग्य तपासणी, औषधींचे वाटप, रक्तघटक तपासणी, वस्त्रदान, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू वितरण, मच्छरदाणी वाटप, अन्नदान आदी उपक्रम राबविले. कोरोनाकाळामुळे गेली २ वर्षे या उपक्रमात खंड पडला होता; पण यावर्षी तो पुन्हा सुरू करण्यात आला. यावर्षीच्या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते महेश काबरा यांनी जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून दिला. बिनागुंडा, फोदेवाडा, तुर्रेमर्का, कुवाकोडी, गुंडेनूर या गावातून जवळपास ३५० ते ४०० लोकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला.
२०१२ मध्ये झाली सुरुवात
भामरागड तालुक्यातील बिनागुंडा हे तसे दुर्गम; पण तेवढेच निसर्गरम्य असे स्थळ; पण त्या ठिकाणी राहणारे लोक अत्यंत गरीब आणि मागास आहेत. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना वैद्यकीय सुविधा मिळणे त्यांच्यासाठी दुरापास्त. ही बाब गडचिरोली येथील डॉ. शिवनाथ कुंभारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्षात आणून दिली. समाजाप्रती आपली बांधीलकी आहे आणि हा खडतर प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे, हा विडा उचलून डॉ.अनंत कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली एक फळी या कामात गुंतली. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेल्या, अतिदुर्गम आणि मागास अशा बिनागुंडा गावात सन २०१२ पासून आरोग्य मेळावा घेण्यास सुरुवात झाली.