मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 10:50 IST2022-07-22T10:46:38+5:302022-07-22T10:50:02+5:30
तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका
गडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेला भव्य असा मेडीगड्डा प्रकल्प (लक्ष्मी बॅरेज) तेलंगणातील नागरिकांसाठी तारक, तर महाराष्ट्राच्या हद्दीतील नागरिकांसाठी मारक ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
तब्बल १८ लाख ५० हजार एकर शेतीला सिंचन करण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाचे पाणी तेलंगणाच्या अनेक भागासह हैदराबादपर्यंत नेले जाते; पण प्रकल्पाला लागून असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला थेंबभरही पाणी मिळत नाही. पावसाळ्यात मात्र गोदावरी तुडुंब भरल्यानंतर या नदीचे बॅक वॉटर, तसेच गोदावरीला येऊन मिळणाऱ्या प्राणहिता नदीचे बॅक वॉटर सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे आणि शेतात पसरते. दुसरीकडे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर खालील बाजूकडील गावांना फटका बसतो.
जमीनच राहणार नाही तर शेती करायची कशी?
तब्बल ८५ गेट असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे सर्व गेट उघडल्यानंतर बाहेर पडणारे पाणी नदीकाठावरील शेकडो हेक्टर जमिनीला खरडून काढते. यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीकच नाही तर सुपीक जमीनही दरवर्षी वाहून जात आहे. हे भरून न निघणारे नुकसान आहे. हे सत्र असेच सुरू राहिले तर काही वर्षांत येथील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांकडे जमीनच शिल्लक राहणार नाही.
अनेकांचे संसार आले उघड्यावर
गेल्या दोन आठवड्यात तर प्रकल्पाच्या खालील भागातील १० ते १२ गावांमधील नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पाण्याच्या विसर्गामुळे शेतासोबत राहत्या घरांमध्येही पाणी शिरल्याने अनेक लोकांनी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत तंबू ठोकून त्यात ते विस्थापितांचे जीवन जगत आहेत. वीज, पाणी, औषधोपचार अशा सर्वच बाबतीत त्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने चार दिवस आश्रय देऊन गावाकडे रवाना केले असले तरी पुन्हा गावात पाणी शिरण्याच्या भीतीने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी तंबू ठोकून राहणे पसंत करत आहेत.
गोदावरीने ओलांडली १९८६ ची महत्तम पातळी
कालेश्वरम् (तेंलंगणा) येथील सरिता मापन केंद्रावर घेतलेल्या नोंदीनुसार यावर्षी गोदावरी नदीने १९८६ मधील महत्तम पाणी पातळी (१०७.०५ मीटर) ओलांडून १०८.१८ मीटर एवढी पातळी गाठली. मेडीगड्डा बॅरेजमुळेच गोदावरीने ही महत्तम पातळी गाठली असून, ही स्थिती यापुढे दरवर्षी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.