Lok Sabha Election 2019; वणव्यामुळे दुर्गम भागातील वीज गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:14 IST2019-04-11T00:12:13+5:302019-04-11T00:14:10+5:30
एटापल्ली ते भामरागड दरम्यानची वीज लाईन जंगलातून गेली आहे. जंगलाला आगी लावल्या जात आहेत. या आगीमुळे वाढलेले झाड वीज तारांवर कोसळत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत.

Lok Sabha Election 2019; वणव्यामुळे दुर्गम भागातील वीज गायब
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : एटापल्ली ते भामरागड दरम्यानची वीज लाईन जंगलातून गेली आहे. जंगलाला आगी लावल्या जात आहेत. या आगीमुळे वाढलेले झाड वीज तारांवर कोसळत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत. मागील आठ दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
भामरागड येथील सबस्टेशनला एटापल्ली तालुक्यातून वीज पुरवठा केला आहे. या सबस्टेशनवरून भामरागड व अहेरी तालुक्यातील काही गावे जोडण्यात आली आहेत. एटापल्ली ते भामरागडपर्यंतची वीज लाईन जंगलातून टाकली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्यानंतर एखादे झाड कोसळून वीज पुरवठा खंडीत होतो. मात्र सद्य:स्थितीत वादळ वारा नसतानाही वीज पुरवठा खंडित होत आहे. आठ दिवसांपासून सातत्याने वीज पुवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.
एप्रिल महिन्याला सुरूवात झाल्याने जंगलाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आगीदरम्यान वीज तारांजवळचे एखादे सुकलेले झाड जळून ते तारांवर कोसळते. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होत आहे. ज्या ठिकाणी झाड कोसळले, त्याच्या पुढच्या गावांचा वीज पुरवठा खंडीत करून केला जात आहे. या घटनांवर वीज कर्मचारी सातत्याने लक्ष देऊन आहेत, अशी माहिती महावितरणचे अभियंता पाटील यांनी दिली आहे.
एटापल्ली तालुक्यातून भामरागड तालुक्यातील गावांबरोबरच अहेरी तालुक्यातील गावांनाही विजेचा पुरवठा केला जातो. त्यामुळे सततच्या वीज पुरवठ्याने अहेरी तालुक्यातील जंगलव्याप्त गावांमधील नागरिकरही त्रस्त झाले आहेत.
पोलिंग पार्ट्यांनाही फटका
११ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. भामरागड तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्र दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडतात. त्यामुळे पोलिंग पार्ट्या मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीच आणून ठेवल्या जातात. त्याचबरोबर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तालुकास्तरावर नेले जाते. त्यामुळे किमान तीन दिवस पोलिंग पार्टीचा गावात मुक्काम राहणार आहे. अशातच गावात अंधार राहात असल्याने याचा त्रास पोलिंग पार्टीलाही होणार आहे.