दादांना अनोखी मानवंदना...
By Admin | Updated: August 10, 2015 02:10 IST2015-08-10T02:10:51+5:302015-08-10T02:10:51+5:30
विनोदाचे अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे, याची चांगली उमज हे दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने रौप्य महोत्सवी यश मिळवले.

दादांना अनोखी मानवंदना...
विनोदाचे अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे, याची चांगली उमज हे दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने रौप्य महोत्सवी यश मिळवले. आजही दादा कोंडकेंचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. त्यांच्यावरच्या याच प्रेमापोटी निर्माते अतिफ, सहनिर्माते हेमंत अणावकर आणि दिग्दर्शक आर. विराज यांनी ‘वाजलाच पाहिजे - गेम की शिणेमा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट फूल टू दादा कोंडके स्टाईल आहे. आताच्या काळात मराठी इंडस्ट्रीत अचूक टायमिंग आणि उत्तम कॉमेडी सेन्स असणाऱ्या भाऊ कदम यांचा अभिनय हे या सिनेमाचं आकर्षण. या सिनेमातील गाण्यांनाही खास दादा कोंडके टच आहे. हा चित्रपट दादा कोंडकेंची आठवण रसिकांना करून देईल, असा विश्वास निर्मात्या दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि चित्रपटनिर्मिती कशा प्रकारे होते यावर गमतीशीर भाष्य करणारं या चित्रपटाचं कथानक आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद बाळ उर्फ पराग कुलकर्णी व अमोल यांचे आहेत. राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, गिरिजा जोशी, आरती सोलंकी, संजय मोहिते आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. दादा कोंडकेंना समर्पित ‘वाजलाच पाहिजे- गेम की शिणेमा’ हा चित्रपट ११ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.