आज लोकप्रिय गायिका गीता दत्त यांची पुण्यतिथी

By Admin | Updated: July 20, 2016 08:47 IST2016-07-20T08:47:31+5:302016-07-20T08:47:31+5:30

गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला, २० वर्षाच्या काळात त्यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूड्सची गाणी गायिली

Today's death anniversary of popular singer Geeta Dutt | आज लोकप्रिय गायिका गीता दत्त यांची पुण्यतिथी

आज लोकप्रिय गायिका गीता दत्त यांची पुण्यतिथी

>संजीव वेलणकर -
जन्म:- २३ नोव्हेंबर १९३० 
पुणे, दि. २० - १९४६ साली ललिता पवार यांचे पती हनुमानप्रसाद यांनी प्रथम गीता दत्त यांना गाण्यासाठी पहिला ब्रेक दिला. गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली. ‘‘आज सजन मोहे अंग लगा लो, जनम सफल हो जाए’ हे गुरुदत्तच्या ‘प्यासा’मधलं गीत. ज्या अतृप्तीच्या बेहोषित गुरुदत्तने ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहेब बिबी और गुलाम’सारखे अविस्मरणीय चित्रपट काढले, त्याच अतृप्तीचा स्पर्श गीता दत्तच्या ‘मेरा सुंदर सपना बीत गया’, ‘वक्त ने किया, क्या हँसी सितम’, ‘तुम रहे ना तुम, हम रहे ना हम’सारख्या गाण्यांतून जाणवतो. हे गाणं ‘कागज के फूल’ चित्रपटात वहिदा रहेमानवर चित्रित केलं असलं तरी ते गाणं तितकंच गीता दत्तचंसुद्धा आहे. वहिदाच्या चेह-यावरचा दु:खाचा गहिरा भाव गीता दत्त अधिकाधिक गडद करते. संगीतक्षेत्रात आणि व्यक्तिगत आयुष्यात गीताच्या वाटय़ाला आलेली उपेक्षेची आच या गाण्यात थेट उमटताना दिसते. गीता दत्तच्या आवाजातला दर्द जसा घायाळ करतो, तसंच शालिनतेची डूब असलेली तिच्या आवाजातली मादकताही मनाला भावुन जाते. पावसाळय़ात दाटून येणा-या ढगांबरोबर काळजात खूप काही दाटून येतं. म्हणजे व्याकुळता गडद करणा-या अनेक गोष्टी, उदा. राज कपूरचा ‘बरसात’, मीनाकुमारीचा ‘पाकीजा’, मधुबालाचा ‘मोगले-ए-आझम’ आणि त्याचवेळी गीता दत्तचे अनवट सूर कातरता वाढवतात. 
‘बागी’मधलं गीता बालीवर चित्रित केलेलं ‘तदबीर से बिगडी हुई, तकदीर बना ले’हे गाणं ऐकताना गीता बालीच्या चेह-यावरचा खटय़ाळपणा अधिक मोहक की, गीता दत्तच्या आवाजातला नाद अधिक मोहक असा संभ्रम पडतो. या गाण्यात गीता बालीच्या चेह-यावरची एकेक मिष्कील रेषा गीता दत्तच्या आवाजाने टिपली आहे. गीता बालीचा चेहरा आणि गीता दत्तचा आवाज याचं एक भन्नाट कॉकटेल ‘बाजी’मधल्या या गाण्यात जमून आलं आहे. म्हणूनच त्या गाण्याची गोडी आजही अवीट आहे. गीता दत्त यांची किती गाणी लक्षात ठेवायची ? ‘आँखो ही आँखो में इशारा हो गया’, ‘जाता कहाँ है दिवाने’ यातला खोडकर इशारा असो, की ‘नन्ही कली सोने चली’ या अंगाई गीतातला मृदुल गारवा असू दे, गीताच्या परिसस्पर्शाने गाण्याचं सोनं होतं. ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’, म्हणताना शब्दश: फुलपाखराची नवथर थरथर गीता दत्तच्या आवाजातून जाणवायची.
‘हावडा ब्रीज’मधलं मधुबालावर चित्रित केलेलं ‘मेरा नाम चीन् चीन् चू’ असो की, ‘हूँ अभी मैं जवाँ ए दिल’सारखी उडत्या चालीची गाणी असोत. गीता दत्त गायली मोकळ्या गळ्याने. उडत्या चालीची जलद लय पकडताना आवाजातलं लालित्य तिने पणाला लावलं. तिने गाण्यातल्या भाववृत्तीला ज्या ताकदीने न्याय दिला आहे, त्यावरूनच तिच्या प्रतिमेची ओळख पटते. तिच्या आवाजात एकसुरीपणा कधीच जाणवला नाही. गीता बाली असो, मधुबाला असो वा मीना कुमारी प्रत्येक व्यक्तिरेखेची अचूक नस गीता दत्त पकडत असे. ‘साहब बिबी गुलाम’मधील ‘न जाओ ..’ गाताना पतीला भेटण्याची आतुरता मधाळपणे ठिबकते गीता दत्तच्या आवाजातून.
त्यांच्या आवाजात मादकता होती, पण संयत अन् जीवघेणी. ‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्यांनी तर काळजाचा ठोका चुकावा, पण तोच मादक, मदिर आवाज ‘मै तो प्रेम दिवानी’, ‘मेरा दर्द न जाने कौन’ किंवा ‘घुंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे’ अशा भजनांमध्ये तितकाच लीन-तल्लीन होताना दिसतो. तिच्या भजनातली तन्मयता वियोगीनीच्या दु:खालाही भारदस्तपणा देते. गीता दत्त यांनी पुरुष गायकांसोबतही तितक्याच आत्मविश्वासाने गाणी गायिली. ‘खयालो में किस के इस तरह आया नहीं करते’ हे ‘बावरे नैन’मधलं गीत मुकेशबरोबर गाताना त्याच्या दमदार आवाजाला ताकदीने साथ दिली. तशीच ‘न ये चाँद होगा ना तारे रहेंगे’ गाताना हेमंतकुमारच्या भारदस्त आवाजापुढे ती दबली किंवा कोमजली नाही. ‘हम आप की आँखो को इस दिल में बसा ले तो’ या महंमद रफीबरोबरच्या गाण्याला खेळकर साथ देणारी गीता दत्त असते. गीता दत्त यांनी मराठी गाणीसुद्धा गायिली आहेत, ‘मुक्या मनाचे बोल सजना, बोल झाले फोल’ किंवा ‘जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला, म्हणावे न्या तुझा सीतेला’ ही मराठी गाणी गाणारी गीता दत्तच होती यावर विश्वास बसत नाही. गीता दत्त यांनी संगीतविश्वात आपल्या सुरांनी चौफेर सैर केली. गाण्याच्या आशयाला आपल्या वैविध्यपूर्ण सुरावटींनी न्याय दिला. आपल्या विशिष्ट आवाजाची छाप संगीतक्षेत्रात उमटवली होती. असं असूनही तिच्या वाटय़ाला फार प्रसिद्धी आली नाही. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्याशी तिने विवाह केला. परंतु गुरुदत्त नावाच्या शोकांतिकेचा गीतादत्त ही एक हिस्सा होती. ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहाँ है’ असं म्हणणारा गुरुदत्त, स्त्रीजीवनाचं वास्तव आपल्या कॅमे-याच्या तीक्ष्ण डोळ्यांतून टिपणारा गुरुदत्त गीताला स्वत:च्या चित्रपटांखेरीज इतरत्र गाऊ देत नव्हता, हे वास्तव नाकारता येत नाही. मा.गीता दत्त यांचे २० जुलै १९७२ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.गीता दत्त यांना आदरांजली. 
 

Web Title: Today's death anniversary of popular singer Geeta Dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.