आज उस्ताद अमीर खॉं यांची जयंती
By Admin | Updated: August 15, 2016 12:56 IST2016-08-15T12:56:43+5:302016-08-15T12:56:43+5:30
उस्ताद अमीर खॉं यांची आज (१५ ऑगस्ट) जयंती.

आज उस्ताद अमीर खॉं यांची जयंती
>संजीव वेलणकर
पुणे, दि. १५ - उस्ताद अमीर खॉं यांची आज (१५ ऑगस्ट) जयंती.
अमीर खॉं यांचे आजोबा दरबारी गायक होते. सारंगी व वीणावादक असलेल्या वडिलांकडून छोट्या अमीरना संगीताचे धड़े मिळाले. तसेच, काकांकडून तबलावादनाचेही प्राथमिक शिक्षण मिळाले. घरात छोट्या-मोठ्या गायकांच्या सतत बैठकी होत असत. त्यामुळे अमीरला लहानपणापासूनच भरपूर श्रवणलाभ झाला. लहानपणी ते सारंगी व वीणा शिकत पण त्यांचा आवाज़ जात्याच सुरेल, चपल व तीनही सप्तकांत सहजतेने फिरणारा असल्याने सारंगीपेक्षा गायनाकडेच त्यांनी आपले सर्व लक्ष वळविले. लहानपणीच चीजा व गाणी गाऊन ते ऐकणा-यांना चकित करीत असत. कल्पक बुद्धिमत्तेचे कलावंत असल्याने उस्ताद अमीर खॉं यांनी डोळसपणे सखोल अभ्यास व रियाज़ करून स्वत:ची स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. उस्ताद अब्दुल वहिद खॉं यांच्या विलंबित लयीतील गायनाचा प्रभाव त्यांच्या गायनात होता, तसेच, इंदौर घराण्याचे रजाब अलि खॉं यांची तान गायकी आणि अमान अलि खॉं यांचे मेरुखंड पद्धतीचे रागविस्तार यांच्या प्रभावामुळे अमीर खॉं यांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण गायकी विकसित केली होती. अमान अलि खॉं यांचे शिष्यत्व पत्करून ते चांगले तयारीचे गायक झाले. अभिजात शास्त्रीय संगीतातील ख्यालगायकीतच त्यांनी विशेष मेहनतीने सौंदर्यप्रधान अशी शैली अमीर खॉं यांनी विकसित केली. अधिकतर गंभीर प्रकृतीच्या रागगायनात ते स्वत: अंतर्मुख होऊन रसिकांनाही अंतर्मुख करीत असत. अमीर खॉं यांची गायकी म्हणजे स्वरप्रधान व आलापप्रधान. 'झूमरा' किंवा 'एकताला'च्या अतिविलंबित लयीतील ख्यालासाठी ठेका अगदी साधा असे. ख्यालाची बढ़त, मेरुखंड पद्धतीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, बोलआलाप, आलंकारिक सरगमयुक्त ताना आणि क्लिष्ट व अवघड ताना सहजतेने गाण्याची क्षमता यांनी त्यांच्या गायनाला सौंदर्यपूर्णता आणि सूक्ष्मता लाभली होती. क्वचित मुर्की व कणस्वराचा वापर करून ते गाण्यात सौंदर्य आणत असत. मंद्र व मध्य सप्तकांतील रागविस्तारात न्यास स्वरांनी गायनाला उठाव आणून ते रसिकांना मंत्रमुग्ध करीत. कधी कधी ते अंतरा घेतही नसत. त्यांच्या मते, ख्यालरचनेत शब्द महत्त्वाचे; तर स्वरांच्या रंगांना विशेष अर्थ त्यांनी दिला. त्यांनी स्वत:च्या अनेक रचना लोकप्रिय केल्या. अनेक रुबाईदार तराणे, ख्यालनुमा आणि बंदिशी अमीर खॉं यांनी रचल्या. "हृदयातून निर्माण झालेले, आणि आत्म्याला स्पर्श करणारे ते खरे संगीत" असे ते नेहमी म्हणत. मा. अमीर खॉं 'बैजूबावरा', 'शबाब', 'झनक झनक पायल बाजे' अशा चित्रपटात त्यांनी गायन पण केले. ग़ालिबच्या माहितीपटासाठी त्यांनी ग़ज़लही गायली. पं. हृदयनाथ मंगेशकर, कंकणा बॅनर्जी, कमल बोस, अमरजीत कौर, ए. कानन, भीमसेन शर्मा हे सर्व उस्ताद अमीर खॉं यांचे शिष्य आहेत. अमीर खॉं यांना 'संगीत नाटक अॅकॅडमी अॅवॉर्ड', 'पद्मभूषण', 'राष्ट्रपति अॅवॉर्ड', सूरसिंगार, 'स्वरविलास' पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. मा.उस्ताद अमीर खॉं यांचे १३ फेब्रु. १९७४ रोजी निधन झाले.
लोकमत समूहातर्फे मा.उस्ताद अमीर खॉं यांना आदरांजली.
संदर्भ.कविता इनामदार