नवीन कस्तुरिया आणि मानवी गग्रू झळकणार 'द गुड व्हाइब्ज' या वेबसिरिजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:57 AM2018-08-06T11:57:37+5:302018-08-06T11:58:00+5:30

'द गुड व्हाइब्ज' ही मालिका म्हणजे आजच्या युगामध्ये शहरात राहणाऱ्या जोडप्यांच्या रोजच्या जगण्याचे यथार्थ चित्र उभे करणारी एक मनस्वी गोष्ट आहे.

Naveen kasturia and Maanvi Gagroo in the good vibes | नवीन कस्तुरिया आणि मानवी गग्रू झळकणार 'द गुड व्हाइब्ज' या वेबसिरिजमध्ये

नवीन कस्तुरिया आणि मानवी गग्रू झळकणार 'द गुड व्हाइब्ज' या वेबसिरिजमध्ये

googlenewsNext

इंटरनेटचे जग लवकरच 'गुड व्हाइब्ज'नी मंतरले जाणार आहे! लग्रों इंडिया प्रस्तुत नवीकोरी आणि उत्साहपूर्ण वेबमालिका 'द गुड व्हाइब्ज'च्या निमित्ताने छोट्या पडद्यावरचे सर्वात लाडके जोडपे नवीन कस्तुरिया आणि मानवी गग्रू पुन्हा एकदा डिजिटल मंचावर अवतरणार आहे. या वेबमालिकेचे कथानक लक्ष्य (नवीन) आणि जोनिता (मानवी) या तरुण जोडप्याभोवती फिरते. जुहूच्या एका आलिशान बंगल्यामध्ये राहणारी ही दोघं आपल्या नात्यामधील हरवलेले प्रेम आणि स्वीकार यांचा नव्याने शोध कसा घेतात, याचा प्रवास या कथेतून उलगडण्यात आला आहे. 'द गुड व्हाइब्ज' ही लग्रोंची पहिलीच स्व-निर्मित वेबमालिका आहे. या मालिकेचे कथानकही लग्रोंकडूनच विकसित करण्यात आले आहे.

'द गुड व्हाइब्ज' ही मालिका म्हणजे आजच्या युगामध्ये शहरात राहणाऱ्या जोडप्यांच्या रोजच्या जगण्याचे यथार्थ चित्र उभे करणारी एक मनस्वी गोष्ट आहे. हास्यरसाचा तलम पदर असलेले हे कथानक नात्यामधील मैत्री, प्रणय, नातीगोती आणि पालकत्व अशा सगळ्या पैलूंना स्पर्श करते. लक्ष्य (नवीन) आणि जोनिता (मानवी) हे त्यांच्या सामाजिक वर्तुळामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असलेले जोडपे आहे. आता मात्र हे जोडपे अशा एका भावनिक टप्प्यावर उभे आहेत, जिथे त्यांना आपले वैवाहिक नाते पुन्हा तपासून पाहण्याची गरज जाणवते आहे. एकीकडे त्यांच्या लवकरच येऊ घातलेल्या लग्नाचा वाढदिवसाचा सोहळा कसा साजरा करायचा याबद्दलच्या सूचना त्यांच्या पालकांकडून पाठविल्या जात आहेत तर दुसऱ्या बाजूला या सोहळ्यात वेगळे होत असल्याची जाहीर कबुली तर आपल्याकडून दिली जाणार नाही ना याची दोघांच्याही मनात धास्ती आहे.

अवघ्या सहा भागांमध्ये आटोपशीरपणे बसविण्यात आलेली ही गोष्ट सोनी लिव्ह आणि लग्रों इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असणार आहे. ही मालिका ८ ऑगस्ट (बुधवार)पासून सुरू होत असून दर आठवड्याला तिच्या नव्या भागाचे ऑनलाइन प्रसारण केले जाईल.

या मालिकेच्या अनुभवाविषयी बोलताना मानवी गग्रू सांगते, ''या मालिकेसाठी झालेले चित्रीकरण हा एक अत्यंत आनंददायी अनुभव होता. पूर्वतयारीसाठी काही कार्यशाळा घेण्याइतका वेळ आमच्याजवळ नव्हता, तेव्हा जस-जसे कथानक उलगडेल त्यानुसार त्याच्याशी जुळवून घेत जा इतकेच काय ते आम्हाला सांगण्यात आले होते. नाही म्हटले तरी मुंबईतल्या उकाड्याने थोडा त्रास दिला. पण तेवढे सोडले तर एकूण चित्रीकरणाचा अनुभव आल्हाददायक होता. या मालिकेची कहाणी अगदी साधी-सोपी आहे. आपण ज्या जागेमध्ये राहतो, आपल्या भोवतीचा परिसर इत्यादी गोष्टी आपल्या मूड्सवर, आपल्या स्वास्थ्यावर आणि आपल्या नात्यावरही कशाप्रकारे प्रभाव टाकत असतात, यावर या मालिकेमध्ये भाष्य करण्यात आले आहे. ही मालिका कधी एकदा प्रसारित होतेय, असे मला वाटत आहे. ''

अभिनेता नवीन कस्तुरिया यांच्या मते, '' ही गोष्ट माझ्या मनाच्या अगदी जवळची आहे. लक्ष्य हे पात्र वयाच्या विशी किंवा तिशीतल्या कोणत्याही तरुणासारखेच आहे. एक चांगला पती बनण्याची, आपल्या पत्नी आणि मित्रमंडळींची काळजी वाहण्याची उपजत इच्छा त्याच्याठायी आहे. मला वाटते, आपल्या प्रत्येकालाच हे गुण स्वत:शी मिळतेजुळते वाटतील. पण त्याखेरीज गुड व्हाइब्ज ही एकमेकांना साथ देणाऱ्या, चाकोऱ्यांना आव्हान देणाऱ्या एका नोकरदार जोडप्याचीही गोष्ट आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये सामाजिक नीतिनियमांमुळे उलथापालथ घडून येत आहे. ही मालिका आणि त्यातील पात्रांना प्रेक्षक आवडीने आपलेसे करतील, अशी मला आशा आहे.''
 

Web Title: Naveen kasturia and Maanvi Gagroo in the good vibes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.