मराठमोळ्या सिनेमाला ‘इंग्रजी’चा लळा

By Admin | Updated: August 21, 2016 03:30 IST2016-08-21T03:30:38+5:302016-08-21T03:30:38+5:30

मराठी सिनेमा देशविदेशात गाजत असताना, होम ग्राउंडवरही ‘हाऊसफुल्ल’ होतोय. चांगल्या-बड्या बॅनरच्या चित्रपटांना खाली उतरवून आपले चित्रपट चंदेरी पडद्यावर यशस्वी आक्रमण करीत आहेत.

Take Marathi 'Marathi' in Marathi | मराठमोळ्या सिनेमाला ‘इंग्रजी’चा लळा

मराठमोळ्या सिनेमाला ‘इंग्रजी’चा लळा

मराठी सिनेमा देशविदेशात गाजत असताना, होम ग्राउंडवरही ‘हाऊसफुल्ल’ होतोय. चांगल्या-बड्या बॅनरच्या चित्रपटांना खाली उतरवून आपले चित्रपट चंदेरी पडद्यावर यशस्वी आक्रमण करीत आहेत. मागच्या दोन-तीन वर्षांच्या चित्रपटांचा विचार केला असता कथा-आशय-मांडणी-अभिनय अशा सगळ्याच आघाड्यांवर मराठी चित्रपट तद्दन ‘गल्लाभरू’ सिनेमांपेक्षा सरस ठरतो. याबरोबरच लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या सिनेमांची नावं. ‘टाइमपास,’ ‘डबलसीट,’ ‘हॅपी जर्नी,’ ‘वायझेड,’ ‘हाफ टिकट,’ ‘पोस्टर गर्ल’ अशी इंग्रजी नावं मराठी सिनेमांना कशी चपखल बसतात. विषय पूर्णपणे मराठमोळा; नाव मात्र इंग्रजी. असाच काहीसा ट्रेंड सध्या आला आहे. यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही क्षितिज पटवर्धन, समीर आशा पाटील आणि सतीश राजवाडे यांच्याशी चर्चा केली. त्यातून हे मुद्दे समोर आले...

जनरेशन-वाय
आजची ‘व्हॉट्सअ‍ॅप-यूट्यूब जनरेशन’ चालता-बोलता इंग्रजी शब्द बोलते. त्यामुळे मराठी चित्रपटांना देण्यात येणाऱ्या इंग्रजी नावांत दिग्दर्शक सतीश राजवाडेला काही विशेष वाटत नाही. तो म्हणतो, ‘तंत्रज्ञान आणि समाज ज्या पद्धतीने बदलतोय त्यानुसार असे बदल स्वाभाविकपणे येणारच. इंग्रजी नाव आजच्या पिढीला आपलेसे वाटते, त्यांना कळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते चित्रपटाला एक प्रकारचा अपेक्षित ‘कूल क्वोशंट’ प्रदान करते.’ खरंय! जरा विचार करा ‘क्लासमेट्स’चे नाव वर्गमित्र किंवा ‘टाइमपास’चे नाव विरंगुळा असते तर चित्रपटाच्या विषयाला योग्य न्याय मिळाला असता का? याचा अर्थ असा नाही, की मराठी भाषा कमी पडते. पण प्रत्येक चित्रपट आपलं विश्व निर्माण करीत असतो. त्यावर आपण आपली बंधने टाकू शकत नाही, अगदी भाषेचेसुद्धा नाही.

महानगरीय संस्कृती
एकेकाळी केवळ ग्रामीण संस्कृतीप्राधान्य मराठी सिनेमा बनवला जायचा. शंकर पाटील यांच्यासारखा अस्सल ग्रामीण साहित्यकार पटकथा लिहीत असे. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये शहरीकरण वाढले. खेड्यातून येऊन कित्येक लोक शहरांमध्ये राहू लागले. तेव्हा स्थायिक झालेल्या लोकांची पुढची पिढी ही याच शहरांत वाढली. तीच आजच्या चित्रपटांची ‘टार्गेट आॅडियन्स’ आहे. त्यामुळे चित्रपटांच्या कथांचेही शहरीकरण झाले. इंग्रजी, सेमी-इंग्रजी शाळा/कॉलेजात शिकलेल्या या पिढीला इंग्रजी भाषा पटकन् उमजते. पटकथा-संवादलेखक क्षितिज पटवर्धन सांगतो, ‘महानगरीय संस्कृतीत वाढलेले किंवा तिची ओळख असलेले पे्रक्षकच दैनंदिन जीवनात इंग्रजी-मराठी सरमिसळ असलेली भाषा बोलतात. म्हणून इंग्रजी नाव त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी अत्यंत योग्य असते. टर्मिनॉलॉजी त्यांना ज्ञात असते.’


लेखक- दिग्दर्शकांची पार्श्वभूमी
सिनेमाची सुरुवात लेखकापासून सुरू होते. त्याच्या डोक्यातील कल्पना कागदावर पटकथेच्या रूपात उतरविल्यावर दिग्दर्शक ती मोठ्या पडद्यावर साकारतो. लेखक-दिग्दर्शक कोणत्या वातावरणातून समोर आला आहे, यावरून त्याच्या विचारांची दिशा ठरते. नागराज मंजुळेचे बालपण आणि तारुण्य ज्या पद्धतीने गेले ते त्याच्या सिनेमांतून दिसते. त्याच्या कलाकृतींची नावं ‘पिस्तुल्या,’ ‘फँ ड्री,’ ‘सैराट’ ही नावे त्याचीच साक्ष देतात. आज अनेक नवदिग्दर्शक-लेखक हे शहरी वातावरणातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सिनेमांमध्ये त्याचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटते. मराठी सिनेमांची इंग्रजी नावं हेच दर्शवतात. दिग्दर्शक समीर पाटील म्हणतो, ‘इंग्रजी भाषा इतकी भिनली आहे, की विचारदेखील इंग्लिशमधूनच केला जातो. काळाबरोबर चालण्यासाठी ते अपरिहार्य होऊन बसले आहे.’

काही निवडक
चित्रपटांची इंग्रजी नावं :
बीपी
क्लासमेट्स
फ्रेंड्स
मि. अँड मिसेस सदाचारी
चीटर
आॅनलाइन बिनलाइन
चेकमेट
लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड
वन रूम किचन
पोस्टर बॉइज्
फोटोकॉपी
डिस्को सन्या
७०२ दीक्षित
राजवाडे अँड सन्स
सिंड्रेला
अ पेर्इंग घोस्ट
मर्डर मेस्त्री
वेलकम जिंदगी
कॅरी आॅन मराठा
इश्कवाला लव्ह
प्यारवाली लव्ह स्टोरी
यलो
स्वामी पब्लिक लिमिटेड
टाइम प्लीज
टुरिंग टॉकिज
तेंडुलकर आऊट
डोंबिवली फास्ट
कोर्ट

Web Title: Take Marathi 'Marathi' in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.