स्वप्नील जोशी घेतो कलाकारांची फिरकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 02:40 IST2017-02-13T02:40:20+5:302017-02-13T02:40:20+5:30
'मितवा' सिनेमापासून ते ‘फुगे’ सिनेमापर्यंत जी मैत्री मिळाली ती अतूट मैत्री म्हणावी लागेल, ती म्हणजे दिग्दर्शिक स्वप्ना वाघमारे जोशी आणि चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी

स्वप्नील जोशी घेतो कलाकारांची फिरकी
'मितवा' सिनेमापासून ते ‘फुगे’ सिनेमापर्यंत जी मैत्री मिळाली ती अतूट मैत्री म्हणावी लागेल, ती म्हणजे दिग्दर्शिक स्वप्ना वाघमारे जोशी आणि चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी या दोघांबद्दल. या दोघांची 'मितवा' पासूनची मैत्री आजही अगदी घट्ट आहे. विशेष म्हणजे हे दोघे जोशी असल्याकारणामुळे अगदी सख्ख्या बहिणभावासारखे वावरताना दिसतात. त्याचप्रमाणे सेटवर धम्माल मस्ती करण्यासोबतच नवख्या कलाकारांना टार्गेट करण्याची एकही संधी ही जोडी सोडत नाही. स्वप्ना-स्वप्निल या खोडकर भाऊबहिणींच्या जोशीगिरीचा सामना यापूर्वी ‘मितवा’ मध्ये प्रथमच डेब्यू करणाऱ्या प्रार्थना बेहरेला करावा लागला होता. तसेच ‘लाल इश्क' च्या सेटवर अंजना सुखानी हिलादेखील या दोघांनी असेच बेजार केले होते. त्यामुळे साहजिकच ‘फुगे' सिनेमाद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करणारी नीता शेट्टीदेखील त्यांच्या कचाट्यातून वाचू शकली नाही.
या दोघांनी तिला डीओपी प्रसाद भेंडेच्या पाया पडून त्याला १०१ रुपयाची दक्षिणा देण्याची मराठीत रीत असल्याचे सांगितले. नीताने ते खरे मानत तसे केलेही. कहर म्हणजे प्रसादनेही स्वप्ना-स्वप्निलच्या या कारस्थानात भाग घेत तिला आशीर्वाद देऊन दक्षिणाही घेतली. एवढेच नव्हे, तर सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकरविषयीचे तिचे अज्ञान लक्षात आल्यावर या दोघांनी तिला अगदी भांबावून सोडले होते. स्वप्नाने, तर स्वप्निल बांदोडकरला समजलेय, आता तो तुझ्यावर रागावणार, असे काही बोलत तिला घाबरून सोडले. मात्र, हा सारा मस्करीचा भाग असल्याचे तिला समजताच तिनेदेखील ते हसण्यावारी घेतले. स्वप्ना-स्वप्निलच्या या जोशीगिरीमुळे ‘फुगे’च्या आॅफस्क्रीन सेटवर जशी धम्माल झाली तशीच धम्माल रसिकांना या चित्रपटाच्या माध्यमातून आॅनस्क्रीन पाहायला मिळत आहेत.