दमदार कथा, सुरेख अभिनय
By Admin | Updated: January 30, 2016 08:40 IST2016-01-30T02:59:47+5:302016-01-30T08:40:04+5:30
राजकुमार हिरानी प्रॉडक्शन हाऊसचा व सुधा कोंगरा दिग्दर्शित ‘साला खडूस’ हा चित्रपट तसे पाहता बॉक्सिंग (मुष्टियुद्ध) खेळावर आधारलेला आणखी एक चित्रपट आहे.

दमदार कथा, सुरेख अभिनय
- अनुज अलंकार
हिंदी चित्रपट - साला खडूस
राजकुमार हिरानी प्रॉडक्शन हाऊसचा व सुधा कोंगरा दिग्दर्शित ‘साला खडूस’ हा चित्रपट तसे पाहता बॉक्सिंग (मुष्टियुद्ध) खेळावर आधारलेला आणखी एक चित्रपट आहे. यापूर्वी बॉक्सिंगवर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. मात्र कोंगरा यांचा हा चित्रपट स्वप्न व वास्तव यातील भावभावनांची मर्मस्पर्शी कथा असून, प्रेक्षकांना जिंकण्यात तो यशस्वी झाला आहे.
चित्रपटाची कथा आदित्य (आर. माधवन) या पात्राभोवती फिरते. आदित्य हा माजी मुष्टियोद्धा (बॉक्सिंगचा खेळाडू) आहे. खेळाडू असताना खडूस स्वभावाचा अशी त्याची ओळख होती. त्याला बॉक्सिंगमध्ये नाव कमवायचे असते; मात्र संघटनेतील लोकांच्या राजकारणामुळे त्याची कारकीर्द अयशस्वीरीत्या संपुष्टात येते. अनेक वर्षांनंतर त्याला महिला खेळाडूंचा प्रशिक्षक म्हणून परत रिंगणात आणले जाते. मात्र संघटनेतील राजकारण या वेळीही त्याचा पाठलाग सोडत नाही. बॉक्सिंग असोसिएशनच्या निवड समितीचे प्रमुख जाकीर हुसैन यांच्याशी आदित्यचा संघर्ष झाल्यानंतर शिक्षा म्हणून त्याला चेन्नईला पाठविले जाते. तेथे मासे विकणारी एक अल्लड मुलगी मधी (रितिका सिंह) हिच्यावर त्याची नजर पडते. मधी तिची बहीण लक्ष्मीसह येत असते. लक्ष्मी मुष्टियोद्धा आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसते. पोलीस अधिकारी बनून कुटुंबाला हातभार लावावा यासाठी बॉक्सिंग चॅम्पियन बनण्याचे तिचे स्वप्न आहे. आपल्या बहिणीसोबत मधीही हौशी बॉक्सिंग (मुष्टियुद्ध) करते. मधी तिच्या बहिणीहून अधिक चांगली बॉक्सिंग तर करतेच; परंतु तिच्यात चॅम्पियन बनण्याचीही क्षमता असल्याचे आदित्यला जाणवते. त्यामुळे तो मधीला प्रशिक्षण देऊ लागतो, परंतु काहीही सुरळीत होत नाही. धडाकेबाज मधी आणि त्याच्यात सुरुवातीला ताळमेळ बसत नाही आणि ताळमेळ जेव्हा बसतो तेव्हा मधी आदित्यकडे आकर्षित होते. तथापि, आदित्यचे संपूर्ण लक्ष केवळ बॉक्सिंगवर आहे. मधीला बॉक्सिंगची चॅम्पियन बनविणे आदित्यचे स्वप्न बनते. मधी पहिल्या फेरीत अयशस्वी होते तेव्हा दोघांत संघर्ष होतो आणि दोघे वेगळेही होतात. संघटनेच्या प्रमुखाची मधीवर वाईट नजर असते. ते तिला आणखी एक संधी देण्यासाठी दिल्लीला बोलावतात. एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मधीला रशियाच्या चॅम्पियन खेळाडूविरुद्ध रिंगणात उतरविले जाते. त्यात मधी पराभूत होते.
निवड समिती प्रमुखाच्या वाईट कृतीला विरोध केल्यानंतर मधीला गुन्ह्यात अडकविले जाते. आदित्य पुन्हा तिच्या मदतीला धावून येतो आणि दिल्लीत होणाऱ्या स्पर्धेत संधी मिळवून देण्यासाठी जंग जंग पछाडतो. यावेळी मधी संधी सोडत नाही आणि विजेती बनून आपल्या प्रशिक्षकाचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होते. भावनांचा समतोल हे या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. चित्रपटाचे लेखन दमदार असून, सुधा कोंगरा यांनी सहजभाव कायम ठेवला आहे. एक अनोळखी मुलगी आणि प्रशिक्षकातील नाते एवढ्या तरलतेने दाखवण्यात आले आहे, की ते प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते. चित्रपटाची सुरुवात वेगवान असून, हा वेग संपूर्ण चित्रपटादरम्यान कायम राहतो. चरमबिंदूला भावनांचे जसे वादळच येते. या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेण्यात आर. माधवनचे मोठे योगदान आहे. त्याने अयशस्वी खेळाडू आणि खेळासाठी सर्व काही पणाला लावणाऱ्या प्रशिक्षकाची भूमिका मोठ्या ताकदीने साकारली आहे. त्याची ही भूमिका दीर्घकाळ स्मरणात राहील.
या भूमिकेसाठी अन्य कोणत्याही नावाचा विचार केला जाऊ शकत नाही. माधवन कसदार अभिनेता असून दीर्घ काळापासून चित्रपटसृष्टीत आहे. मात्र रितिका सिंहनेही अभिनयात बाजी मारली आहे. कॅमेऱ्यासमोरील तिचे आत्मविश्वासपूर्ण वावरणे पाहून असे वाटत नाही, की हा तिचा पहिला चित्रपट असेल. पट्टीच्या कलाकाराप्रमाणे तिने भूमिकेचा प्रत्येक पैलू खुलविला आहे. मासे विकणाऱ्या भांडखोर मुलीपासून रिंगणात उतरणारी शक्तिशाली मुलगी आणि प्रशिक्षकाच्या प्रेमात पडणाऱ्या मुलीची भूमिका तिने अत्यंत ताकदीने वठविली आहे. सहायक भूमिकांत कनिष्ठ प्रशिक्षकाच्या भूमिकेत दक्षिणेकडील अभिनेते नसीर, मधीच्या बहिणीच्या भूमिकेत मुमताज सरकार, जाकीर हुसैन यांनीही चांगला अभिनय केला आहे.
चित्रपटाची तांत्रिक बाजूही चांगली आहे. संगीत (संतोष नारायण) प्रभावशाली आहे. चित्रीकरण (शिवकुमार विजयन), एडिटिंगही (सतीश सुरया) सुरेख झाले आहे. क्लायमॅक्समधील बॉक्सिंगच्या सामन्याचे चित्रीकरण आंतरराष्ट्रीय स्टंटमॅन टॉम डेलेमर यांनी केले असून, ते उत्तम जमून आले आहे. दिग्दर्शक म्हणून सुधा कोंगरा यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून, एक सर्वांगसुंदर चित्रपट देण्यात त्या यशस्वी ठरल्या असे म्हणता येईल.
चित्रपटातील उणिवा - खूप उणिवा नाहीत. हा चित्रपट काहींना चक दे इंडियाची आठवण करून देऊ शकतो. तसेच बॉक्सिंगवरील अन्य काही चित्रपटांशी त्याची तुलना होऊ शकते, एवढीच या चित्रपटाची उणीव आहे.
का पाहावा ?
दमदार कथा, शानदार अभिनय
का पाहू नये ?
मसाला चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांचे मनोरंजन होणार नाही.
एकूण म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. चांगल्या चित्रपटासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची तो पूर्तता करतो. चांगल्या चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक चांगली संधी आहे.