कसदार वादनाचा रंग

By Admin | Updated: April 3, 2017 03:33 IST2017-04-03T03:33:21+5:302017-04-03T03:33:21+5:30

साडेसहा ते साडेआठ या वेळात ‘प्रात:स्वर’ या शीर्षकाखाली गायन-वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो

Stain | कसदार वादनाचा रंग

कसदार वादनाचा रंग

‘पंचम निषाद’ या संस्थेतर्फे ‘टाटा कॅपिटल’च्या सहकार्याने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात ‘प्रात:स्वर’ या शीर्षकाखाली गायन-वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. रवींद्र नाट्यमंदिर आणि पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या खुल्या प्रांगणात पावसाळ्यातील चार महिने वगळता उर्वरित आठ महिन्यांत हे कार्यक्रम होतात आणि श्रोतावर्ग त्यांना उत्तम प्रतिसाद देतो. परवाच्या रविवारी दिल्लीत वास्तव्याला असणारे प्रसिद्ध सरोदवादक विश्वजीत रॉयचौधुरी यांचे सरोदवादन ऐकण्याचा योग आला.
विश्वजीत हे अत्यंत अभ्यासू आणि मेहनती कलावंत आहेत. ते मुळात सतारवादक होते. बंगालमधल्या एका लहान गावात ते आपल्या आईवडिलांसोबत राहत होते. त्यांची सतार एका कार्यक्रमात ऐकून अमजाद अली खान खूश झाले आणि त्यांनी त्यांना दिल्लीला नेले. तिथे अमजाद अलींकडे त्यांनी सरोद शिकायला सुरुवात केली आणि ते सरोदवादक बनले. त्यांनी विविध राग आणि गायनशैलींचा अभ्यास सुरू ठेवला. त्यातून बाळासाहेब पछूंवाले आणि मल्लिकार्जुन मन्सूर यांचे शिष्यत्व पत्करून आपले भांडार समृद्ध केले.
रविवारी त्यांचे वादन ऐकताना या रागवैविध्याची जाणीव होत होती. सुरुवातीला त्यांनी ‘विलासखानी तोडी’ हा राग वाजवला. तानसेनाच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर दु:खाने विव्हळ झालेल्या त्यांच्या विलासखान या मुलाने त्या अवस्थेत राग रचला, असे म्हणतात. त्यातला कोमल गंधार, कोमल धैवत आणि कोमल निषाद योग्य श्रुतींसह लागतात, तेव्हा काळीज हलवून टाकतात.
विश्वजीत यांचा राग ‘विलासखानी’ या दर्जाचा होता. त्यांनी ‘अल्हैया बिलावला’, ‘हिंडोल बहार’, ‘बहार’ वगैरे रागांतल्या रचनाही ऐकविल्या. त्यात रागशुद्धतेवर भर होता. सरोदवर हे राग फारसे ऐकायला मिळत नाहीत. अमित चौबे यांनी तबल्यावर सुरेख संगत केली.
>मराठी चित्रगीतातील रागदारी
जुनी मराठी चित्रपटगीते म्हणजे अवीट गोडीची. अगदी ‘कुंकू’ चित्रपटातील ‘भारतीसृष्टीचे सौंदर्य खेळे’पासून ‘पुत्र व्हावा ऐसा’मधील ‘जिथे सागरा धरणी मिळते’पर्यंत सर्व गाणी आपण हृदयात साठविली आहेत. या गीतांमधील रागदारीचा अनुभव देणारा रंजक कार्यक्रम गुरुवार, ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळात शिवाजी पार्क नागरिक संघातर्फे (दादर प.) त्यांच्या शिवाजी पार्क परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि समीक्षक पं. अमरेंद्र धनेश्वर तो सादर करणार आहेत. संगीत मिश्रा (सारंगी) आणि उन्मेषा आठवले (तबला) साथसंगत करणार आहेत.

Web Title: Stain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.