‘ती फुलराणी’ पुन्हा रंगमंचावर
By Admin | Updated: January 9, 2016 02:39 IST2016-01-09T02:39:33+5:302016-01-09T02:39:33+5:30
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात स्थान मिळविलेले अजरामर नाटक म्हणजे ‘

‘ती फुलराणी’ पुन्हा रंगमंचावर
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात स्थान मिळविलेले अजरामर नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’. दिवंगत अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्या सशक्त अभिनयाने या नाटकाला वेगळी उंची दिली. अमृता सुभाष हिने रंगवलेली फुलराणीदेखील अनेकांच्या पसंतीस उतरली. आता पुन्हा ५ वर्षांच्या गॅपनंतर ‘ती फुलराणी’ हे नाटक नव्या दमाने रंगमंचावर येत आहे. राजेश देशपांडे हे याचे दिग्दर्शन करणार असून धनंजय टाळके याचे निर्माते आहेत. लवकरच रंगमंचावर येणाऱ्या या नाटकात आदिती शारंगधर ‘फुलराणी’च्या भूमिकेमध्ये दिसणार अशा चर्चा आहे; मात्र दिग्दर्शकांनी तिच्या निवडीबाबत साशंकता दर्शविली आहे.
याविषयी राजेश देशपांडे सांगतात, ‘पु.ल. देशपांडे यांचे हे अत्यंत गाजलेले नाटक असल्याने संहितेमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. परंतु एका नव्या बाजात हे नाटक रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न असेल. मुद्दाम कुठलेही वेगळे प्रयोग केले जाणार नाहीत. अपवाद केवळ तांत्रिक बाबींचा असेल. फुलराणीच्या भूमिकेसाठी चार अभिनेत्री डोळ्यासमोर आहेत; मात्र अजून फायनल झालेले नाही. नाटकासाठी वेळ देऊ शकणाऱ्या कलाकारांना प्राधान्य देण्याचा विचार आहे. सतीश दुभाषी, अविनाश नारकर यांनी यापूर्वीच्या नाटकात प्राध्यापकाची भूमिका केली होती. यासाठी डॉ. गिरीश ओक यांचे नाव विचाराधीन आहे.