शाहरूखच्या रईसला खऱ्या रईसच्या मुलानं बजावली नोटीस
By Admin | Updated: March 2, 2016 19:08 IST2016-03-02T19:08:48+5:302016-03-02T19:08:48+5:30
गुजरातमधला गुंड अब्दुल लतीफच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असून लतिफचा मुलगा मुस्ताक अहमद अब्दुल लतीफ शेख याने शाहरूखसह या चित्रपटाशी संबंधित नऊ जणांना नोटीस बजावली

शाहरूखच्या रईसला खऱ्या रईसच्या मुलानं बजावली नोटीस
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - रईस या शाहरूख खानची भूमिका असलेल्या चित्रपटाला खऱ्या रईसच्या मुलानं कायदेशीर नोटीस बजावली आहे. गुजरातमधला गुंड अब्दुल लतीफच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असून लतिफचा मुलगा मुस्ताक अहमद अब्दुल लतीफ शेख याने शाहरूखसह या चित्रपटाशी संबंधित नऊ जणांना नोटीस बजावली असून माझ्या वडिलांच्या आयुष्यावर तुम्ही कसा काय चित्रपट बनवू शकता अशी विचारणा केली आहे.
अब्दुल लतीफ हा गुजरातमधल्या दारूच्या व्यापारातला कुख्यात गुंड होता व त्याच्या नावावर 40 खुनांचा आरोप होता. मात्र, मुस्ताकचे वडील हे प्रसिद्ध उद्योजक आणि समाजात मानाचं स्थान असलेले व्यक्ती होते असा उल्लेख या नोटिशीमध्ये करण्यात आल्याचे वृत्त डीएनएने दिले आहे.
त्यामुळे अब्दुल लतीफना चुकीच्या पद्धतीने रंगवले जात असल्याचा आरोपही मुस्ताकने केला आहे.
रईसला प्रसारणाआधीच समस्या
याआधीही शाहरूख गुजरातमध्ये असताना विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनांना सामोरे जावे लागले होते. त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली तसेच विरोधी घोषणा दिल्या गेल्या आणि शाहरूखची पोस्टर्सही फाडण्यात आली. भारतातल्या असहिष्णूतेसंदर्भात त्याने केलेल्या विधानांसाठी त्याच्याविरोधात निदर्शने झाली.
सरखेझ रोझा मशिदीमध्ये पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय चित्रीकरणाचा प्रयत्न केल्याबद्दलही रईसला आडकाठी करण्यात आली होती.
तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान रईसमध्ये पदार्पण करत असून शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यावर बंदी घालण्याचे आवाहन करत मुंबईत शुटींग करम्यात विघ्ने आणली होती.