क्रांती रेडकरचे झाले दोनाचे चार हात
By Admin | Updated: March 30, 2017 18:11 IST2017-03-30T17:41:28+5:302017-03-30T18:11:14+5:30
कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्यावर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना थिरकायला लावणारी अभिनेत्री क्रांती रेडकरने गुपचूप लग्न केले आहे.

क्रांती रेडकरचे झाले दोनाचे चार हात
tyle="text-align: justify;">प्राजक्ता चिटणीस / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली.. हे गाणं ऐकू आलं की आपसूकच सर्वांचे पाय थिरकायला लागतात. या गाण्यावर आजवर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना थिरकायला लावणारी अभिनेत्री क्रांती रेडकरने गुपचूप लग्न केले आहे.
तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसला असेल. हो, पण हे खरे आहे क्रांती आता क्रांती रेडकर नसून क्रांती रेडकर वानखेडे आहे. क्रांती लग्न करणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. पण मीडियापासून दूर राहून क्रांतीने 29 मार्चला लग्न केले. तिच्या लग्नाला केवळ तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि नातलग उपस्थित होते.
एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही क्रांतीने लग्न गाजावाजा न करता अगदी साधेपणाने लग्न करणे पसंत केले. याविषयी क्रांती सांगते, "माझे पती हे देश सेवेत असल्याने त्यांच्यासाठी त्यांची ओळख ही गुलदस्त्यात ठेवणे हे गरजेचे असते आणि त्याचमुळे आम्ही दोघांनी अगदी साधेपणाने लग्न करायचे ठरवले. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यातील वेडेपणा आयुष्यभर राहू देणारा नवरा मला मिळाला पाहिजे असे माझ्या मैत्रिणींना नेहमीच वाटायचे आणि तो तसाच आहे.
तो नेहमीच माझ्यातला मी पणा मला जपायला सांगत असतो. तो आणि मी स्वभावाने पूर्णपणे विभिन्न आहोत. तो तणावात असेल तर काहीच क्षणात मी तो तणाव दूर करण्यास सक्षम असते. आम्ही पती-पत्नी होण्याआधी एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत आणि आयुष्यभर राहाणार यात काही शंकाच नाही. मी लग्नानंतरही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून माझे करियर सुरूच ठेवणार आहे. तो नेहमीच माझ्या करियरसाठी मला पाठिंबा देत असतो. मला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत असून यापुढेही मी पडद्यामागे आणि पडद्यावर दोन्ही ठिकाणी झळकणार आहे."