रांजण चित्रपटाच्या टीमने दिली लोकमत आॅफिसला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 05:42 IST2017-02-22T05:42:10+5:302017-02-22T05:42:10+5:30
प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा रांजण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे

रांजण चित्रपटाच्या टीमने दिली लोकमत आॅफिसला भेट
प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा रांजण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांत बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश पवार, निर्माते रवींद्र हरपळे, यश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, पुष्कर लोणाकर आदी कलाकार उपस्थित होते.
चित्रपटाविषयी दिग्दर्शक प्रकाश पवार सांगतात, 'रांजण'मध्येही शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमकथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते. मूलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही त्यातून व्यक्त होतो. त्यामुळे या चित्रपटाचा आनंद लहान मुलांसहित पालकही घेऊ शकतात. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच छान होता. एका नवीन विषयावर काम करण्यास मजा आली.
या चित्रपटाच्या माध्यमातून यश कुलकर्णी याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो या चित्रपटाविषयी सांगतो, ‘हा माझा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी मी अवतार या चित्रपटाच्या माध्यमातून विनोदी भूमिकेत झळकलो होतो. आता या चित्रपटातील माझी भूमिका वेगळी आहे. या चित्रपटातील माझी प्रतापची भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. तसेच दिग्दर्शकाकडून खूप काही शिकण्यास मिळाले. या चित्रपटाचा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप छान आणि अविस्मरणीय होता.
रांजण या चित्रपटात प्रेक्षकांना या कलाकारांसहित भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी अशा तगड्या कलाकारांचादेखील समावेश आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील गाण्यांनी तर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. 'लागीर झालं रं' या गाण्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. अजय गोगावले यांनी त्यांच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि गाण्याचं चित्रीकरण यामुळे चित्रपटाला चार चाँद लागले आहेत. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.