‘फँटम’ने केला अपेक्षाभंग
By Admin | Updated: September 1, 2015 09:07 IST2015-09-01T03:24:36+5:302015-09-01T09:07:26+5:30
पाकिस्तानात घुसून २६/११ हल्ल्याच्या (मुंबई हल्ला) दहशतवाद्यांना ठार मारण्याची रोमांचकारक कथा असलेल्या ‘फँटम’ला बॉक्स आॅफिसवर पहिल्या तीन दिवसांत ते यश मिळाले नाही

‘फँटम’ने केला अपेक्षाभंग
पाकिस्तानात घुसून २६/११ हल्ल्याच्या (मुंबई हल्ला) दहशतवाद्यांना ठार मारण्याची रोमांचकारक कथा असलेल्या ‘फँटम’ला बॉक्स आॅफिसवर पहिल्या तीन दिवसांत ते यश मिळाले नाही. प्रदर्शित झाला त्याच दिवशी त्याची ओपनिंग यथातथाच तर शुक्रवारची कमाई ८ कोटींच्या जवळपासची होती. सैफ अली खान व कतरिना कैफची जोडी असताना झालेली कमाई अपेक्षेनुसार नव्हती. शनिवारी राखी पौर्णिमेनिमित्तच्या सुटीमुळे स्वाभाविकच कमाई वाढून चांगली म्हणता येईल अशी १२ कोटी रुपयांची झाली. धक्कादायक म्हणजे रविवारची कमाई शनिवारच्या कमाईपेक्षाही कमी झाली. रविवारचा गल्ला १२ कोटी रुपयांचाही झाला नाही. साधारणत: पहिल्या तीन दिवसांत सर्वात जास्त कमाई ही रविवारीच होते. ‘फँटम’ची रविवारची कमाई ११ कोटींच्या जवळपासची झाली. याप्रकारे पहिल्या आठवड्याच्या शेवटी गल्ला ३३ कोटींच्या जवळपासचा झाला. चित्रपटसृष्टीतील जाणकारांचे म्हणणे असे आहे की, ‘एक था टायगर’ व ‘बजरंगी भाईजान’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या कबीर खान यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या ‘फँटम’ने पूर्ण केल्या नाहीत. कबीर खानने ‘फँटम’साठी विषय तर चांगला निवडला, परंतु चित्रपटाची सुस्तावलेली गती आणि विषयाकडे बघण्याची चित्रपटीय दृष्टी यामुळे हा चित्रपट वस्तुनिष्ठ असल्याच्या त्यांच्या दाव्याला खोडून काढतो. सैफचा मृत्यू होतो असा चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना आवडला नाही, असेही समजते.
प्रदर्शित झालेल्या अन्य चित्रपटांचाही बॉक्स आॅफिसवर टिकाव लागला नाही. कुणाल कपूर व राधिका आपटेची भूमिका असलेल्या ‘कौन कितने पानी में’, राजपाल यादवचा ‘बांके की बारात’ आणि जॅकी श्रॉफ व मनीषा कोईरालाच्या ‘चेहरे’सह सगळ्या चित्रपटांना काहीही विशेष करून दाखवता आले नाही.
मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर पत्नीच्या प्रेमात डोंगर खोदून रस्ता तयार करण्याच्या जिद्दीत २२ वर्षे खर्च करणाऱ्या बिहारच्या दशरथ मांझी यांच्यावर दिग्दर्शक केतन मेहता यांनी बनविलेल्या ‘मांझी - द माऊंटेन मॅन’ची कमाई दुसऱ्या आठवड्याअखेर म्हणजे दहा दिवसांत १० कोटींपेक्षा जास्त झाली. त्याच्या निर्मितीवर जेवढा खर्च झाला त्या तुलनेत ही कमाई चांगली समजली जाते. अर्थात या चित्रपटाकडून बॉक्स आॅफिसवर फार मोठ्या कमाईची अपेक्षाही नव्हती. बॉक्स आॅफिसवर अतिशय वाईट पद्धतीने आपटलेल्या चित्रपटात दिग्दर्शक उमेश शुक्ला यांच्या ‘आॅल इज वेल’चा समावेश आहे. या चित्रपटाबद्दल सगळे काही वाईटच घडले आहे. ऋषी कपूर आणि अभिषेक बच्चन यांनाही हा चित्रपट बुडण्यापासून थांबवता आला नाही. करण जोहरच्या कंपनीने बनविलेल्या ‘ब्रदर्स’ची तिसऱ्या दिवशीची कमाई ८४ कोटींपर्यंत गेली आहे.
येत्या शुक्रवारी कॉमेडी चित्रपट ‘वेलकम’चा पुढचा भाग (सिक्वेल) प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शन अनीस बज्मीचे असून आधीच्या ‘वेलकम’मधील कलाकार नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल यांच्याबरोबर जॉन अब्राहम, श्रुती हसन, नसिरुद्दीन शाह व डिंपल कपाडिया सिक्वेलमध्ये आहेत.