फर्स्ट फ्रायडेवर मात्र काळी छाया
By Admin | Updated: December 31, 2015 03:51 IST2015-12-31T03:51:45+5:302015-12-31T03:51:45+5:30
बॉलीवूडमध्ये कायम असलेल्या अंधविश्वासाचे अनेक किस्से आहेत. केवळ जानेवारीच नाही तर जानेवारी महिन्यातील पहिल्या शुक्रवारवरही जणू अपयशाची काळी छाया असल्यासारखे बघितले जाते.

फर्स्ट फ्रायडेवर मात्र काळी छाया
बॉलीवूडमध्ये कायम असलेल्या अंधविश्वासाचे अनेक किस्से आहेत. केवळ जानेवारीच नाही तर जानेवारी महिन्यातील पहिल्या शुक्रवारवरही जणू अपयशाची काळी छाया असल्यासारखे बघितले जाते. यंदाही तसेच घडत आहे. नववर्षाच्या पहिल्या शुक्रवारी एकही नवीन चित्रपट नाही. याचा फायदा ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ला होणार आहे. वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांना बॉक्स आॅफिसवर यश मिळाले नाही. म्हणूनच बॉलीवूडमध्ये वर्षाचा पहिला शुक्र वार ‘अनलकी’ मानला जातो.
आधी ही धारणा फक्त पहिल्या शुक्रवारपर्यंत मर्यादित होती. मात्र ती आता दुसऱ्या सप्ताहात रिलीज होणाऱ्या चित्रपटापर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षी २०१५ च्या पहिल्या शुक्रवारी कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. मात्र दुसऱ्या शुक्र वारी ९ जानेवारीला बोनी कपूरचा ‘तेवर’ चित्रपट आला. ज्यात अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हाची जोडी होती. अर्जुन कपूरच्या या सोलो चित्रपटापासून फार अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुपर फ्लॉप ठरला. २०१४ मध्ये पहिल्या शुक्रवारी अरशद वारसीचा ‘जो बी करवालो’ प्रदर्शित झाला, तर दुसऱ्या शुक्रवारी नसीरुद्दीन शाह आणि माधुरी दीक्षितचा ‘डेढ़ इश्किया’ रिलीज झाला. दोन्हीही चित्रपटांचा एका आठवड्यात फ्लॉप चित्रपटांच्या यादीत समावेश झाला.
२०१३ची सुरुवात राजीव खंडेलवालचा सस्पेन्स चित्रपट ‘टेबल नंं. २१’ पासून झाली आणि यानंतर विशाल भारद्वाजचा ‘मटरू की बिजली का मंडोला’ (इमरान खान, अनुष्का शर्मा आणि पंकज कपूर) प्रदर्शित झाला आणि दोघांचे परिणाम वाईट झाले. २०१२ चा पहिला रिलीज चित्रपट ‘प्लेयर’ होता. अब्बास-मस्तानचा हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट एवढ्या वाईट अवस्थेत फ्लॉप राहिला की तीन वर्षांत या जोडीने पुन्हा थ्रिलर चित्रपट नाही बनविला. २०१० मध्ये असेच काही ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटासोबत घडले. ज्याला शाहरूख खान, सुश्मिता सेन आणि फरदीन खानसारख्या चेहऱ्यांची चमकदेखील वाचवू शकली नाही. २००९ च्या सुरुवातीला असाच झटका अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोणला बसला. पहिल्याच वेळी ही जोडी ‘चांदनी चौक टू चायना’त आली आणि हा चित्रपट जोरात आपटला. २००८ मध्ये राजकुमार संतोषीच्या ‘हल्लाबोल’ने देखील या प्रकारचा झटका अजय देवगणला दिला. २००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय अभिनित मणिरत्नमच्या ‘गुरू’ चित्रपटात दोघांची प्रशंसा नक्की झाली. मात्र बॉक्स आॅफिसवर चित्रपटाला तोटा झाला. २००६ च्या सुरुवातीला दोन मोठे चित्रपट मागे-पुढे आले आणि दोघांनाही अपयशाचा सामना करावा लागला. संजय गुप्ताचा ‘जिंदा’ (संजय दत्त-जॉन अब्राहम) आणि राजकुमार संतोषींचा गँगवॉरवर आधारित चित्रपट ‘फॅमिली’सोबत २००६ ची वाईट सुरुवात होती. २००५ मध्ये ‘वादा’ (झायेद खान-अमिषा पटेल, अर्जुन रामपाल) आणि इंसान (अक्षय कुमार, अजय देवगण) ने फ्लॉप चित्रपटांचा हा क्रम कायम ठेवला. २००४ मध्ये करिना कपूरचा ‘चमेली, २००३ मध्ये अक्षय कुमारचा तलाश आणि २००२ मध्ये गोविंदा-रवीना टंडनचा चित्रपट ‘अंखियों से गोली मारे’चे परिणामही वाईटच होते.
- anuj.alankar@lokmat.com