'पीके'च्या पोस्टरवर निर्वस्त्र आमिर
By Admin | Updated: August 1, 2014 15:12 IST2014-08-01T13:07:53+5:302014-08-01T15:12:24+5:30
आमिर खानच्या आगामी 'पीके' या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले असून त्यावर तो संपूर्ण निर्वस्त्र अवस्थेत दिसत असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'पीके'च्या पोस्टरवर निर्वस्त्र आमिर
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १ - आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी कसून मेहमत घेणारा, मि.पर्फेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान त्याच्या प्रमोशनसाठीही नेहमीच हटके फंडे वापरतो. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिरच्या बहुचर्चित 'पीके' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले असून त्यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या पोस्टरमध्ये आमिर संपूर्ण निर्वस्त्र दिसत असून त्याच्या हातात फक्त एक टेपरेकॉर्डर दिसत आहे. आमिरचे हे आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड पोस्टर असून त्यावरून चर्चेला उधाण आले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर आमिरने हे पोस्टर अपलोड केले असून 'काय वाटतयं मित्रांनो? लवकर सांगा..' असे ट्विटही त्याने केले आहे. या अनोख्या आणि थक्क करणा-या पोस्टरबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली असून सोशल नेटवर्किंग साईटवर त्याला खूप प्रतिसाद मिळत आहे.
आमिरच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी हे पोस्टर आवडल्याचे तर काहींनी या पोस्टरमुळे आपल्याला अनकम्फर्टेबल वाटल्याचे नमूद केले आहे. आमिरसारख्या अभिनेत्याकडून अशा प्रकारच्या पोस्टरची अपेक्षा नसल्याचे सांगत आपण तुला कधी असे बघू असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रियाही एकाने व्यक्त केली आहे.