कोणतेच शिक्षण वाया जात नाही

By Admin | Updated: November 6, 2015 03:00 IST2015-11-06T03:00:41+5:302015-11-06T03:00:41+5:30

‘मेव्हणे मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे’ हा दुनियादारी चित्रपटातील फेमस डायलॉग कधीही ऐकला, की डोळ्यासमोर येतो तो जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट

No education is wasted | कोणतेच शिक्षण वाया जात नाही

कोणतेच शिक्षण वाया जात नाही

‘मेव्हणे मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे’ हा दुनियादारी चित्रपटातील फेमस डायलॉग कधीही ऐकला, की डोळ्यासमोर येतो तो जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट तिन्ही क्षेत्रांतील आघाडीचा कलाकार. पण तरी त्याचा कायमच लक्षात राहणारा अभिनय म्हणजे ‘घडलंय बिघडलंय’ या आजूबाजूच्या घटनांचा विनोदात्मक पद्धतीने वेध घेणाऱ्या कार्यक्रमातील कृष्ण. त्याची बोलण्याची अदा, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची त्याची हातोटी, पेंद्या या सवंगड्यावरील कृष्णाचे प्रेम सारेच विलोभनीय. आता अभिनेता म्हणून तो प्रसिद्ध असला तरी प्रथम एक इलेक्ट्रिशियन होता.
मात्र, नंतर अभिनयाच्या आवडीने अभिनय क्षेत्रात तो आला. मात्र, तरीही ‘घडलंय बिघडलंय’ कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने जितेंद्रला ओळख मिळाली आणि त्याच्या अभिनयाची गाडी जी सुटली ती कॅम्पस - अ फेअर वॉर, होम मिनिस्टर, हास्यसम्राट, मराठी पाऊल पडते पुढे असे छोट्या पडद्यावरील कार्यक्रम, तसेच सुंबरान, हाय काय नाय काय, शाळा, गुलदस्ता, मॅटर, तुकाराम, दुनियादारी, बाजी, काकण, शासन असे एकसे एक दर्जेदार चित्रपट तर ‘हम तो तेरे आशिक है, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, हमिदाबाईची कोठी, तर नुकतेच
हाफ सेन्च्युरी पूर्ण केलेल्या ‘दोन स्पेशल’ नाटकांपर्यंत हा प्रवास कुठेही हॉल्ट न घेता सुरू आहे. बरं यामध्ये केवळ अभिनयच नाही, तर त्याचे कविमनही आपल्याला अनेकदा अनुभवायला मिळते. या तिन्ही क्षेत्रांतील अनुभव सेलीब्रिटी रिपोर्टर म्हणून जितेंद्र ‘सीएनएक्स’च्या वाचकांशी शेअर करतोय.

मी आता रंगमंच, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत तितक्याच ताकदीने १०० टक्के द्यायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकच क्षेत्राचा दुसऱ्या क्षेत्रात निश्चितच फायदा होतो. माझ्या मते, कोणतेही शिक्षण हे कधीच वाया जात नाही. कारण मी सुरुवातीला सुटीच्या काळात पेपर विकायचो तेव्हा ज्या तडफेने ओरडून पेपर विकायचो आणि माझा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा यासाठी प्रयत्न करायचो, त्याचा उपयोग आजही मला ४००-५००च्या जमावाला विदाऊट माइक हँडल करताना होतो. त्याशिवाय मी इलेक्ट्रिशियनही होतो. त्यामुळे सेटवर शूटिंगच्या वेळी काही प्रॉब्लेम आलाच, तर मला त्या ज्ञानाचा फायदाच होतो.

पूर्वापारची संस्कृती बदलणे आवश्यक
चाकोरीबद्ध पद्धतीने चित्रपट काढणारे अनेक लोक आहेत; पण वेगळा काही तरी प्रयत्न करून दाखविणारे फार कमी आहेत. विषय, मांडणीमध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धतीमध्ये आता बदल करून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. हा बदल खरोखरीच स्वागतार्ह आहे. ‘विहीर’सारखे दर्जेदार चित्रपट चालत नाहीत, याचे मला दु:ख होते. कारण हे चित्रपट आपण पूर्वापार धरून बसलेली संस्कृ ती बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

काही चित्रपट ही विशिष्ट वर्गाची गरज
‘दुनियादारी’सारखे चित्रपट लोकांचं मनोरंजन करतात आणि ते जेव्हा करोडोंचा बिझनेस मिळवून देतात, तेव्हाच कमी बजेटचे असले तरी वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार होऊ शकतात. त्यामुळे दुनियादारी, दगडी चाळसारखे चित्रपट ही वेगळ्या प्रेक्षकवर्गाची गरज आहे आणि किल्ला, कोर्ट असे चित्रपट असो किंवा ‘नाग माझा भाऊराया’ चित्रपट; विशिष्ट वर्गाची ती गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या आवडीने चित्रपट पाहावेत आणि जशी भूक आहे त्याप्रमाणेच खावे.

लो बजेट चित्रपटांना
मिळावा राजाश्रय
कमी बजेट असणाऱ्या चित्रपटांना आश्रय मिळाला पाहिजे. कारण, व्यवसाय करणे हा एकमेव उद्देश चित्रपट बनवण्यामागे अजिबातच नसतो. प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळेपण असते. प्रत्येक नाटक आणि चित्रपटाचा एक वेगळा दर्जा असतो; त्यामुळे कमी बजेट असले तरी त्यातील गुणवत्ता पाहून त्यांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. कारण व्यवसाय तर असतोच; पण त्या चौकटीबाहेरही विचार केला पाहिजे.

Web Title: No education is wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.