मल्टिस्टार चित्रपटांची मांदियाळी
By Admin | Updated: January 9, 2016 02:48 IST2016-01-09T02:48:17+5:302016-01-09T02:48:17+5:30
आपल्या देशात सिने तारे-तारकांविषयी प्रेक्षकांना विलक्षण आकर्षण आहे. प्रत्येक स्टार्सचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.

मल्टिस्टार चित्रपटांची मांदियाळी
आपल्या देशात सिने तारे-तारकांविषयी प्रेक्षकांना विलक्षण आकर्षण आहे. प्रत्येक स्टार्सचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ७० एमएमच्या भव्य चंदेरी पडद्यावर आपल्या लाडक्या स्टार्सला पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात आणि यातले अनेक स्टार्स एकाच चित्रपटात सोबत झळकणार असतील तर प्रेक्षकांसाठी जणू ही दिवाळीच असते. हीच क्रेझ कॅश करण्यासाठी निर्माते आता मल्टिस्टार चित्रपटांना प्राधान्य देताना दिसताहेत. काल प्रदर्शित झालेला वजीर हा सिनेमाही त्यातलाच एक आहे. दिलवाले, बाजीराव मस्तानीही हीच परंपरा पुढे चालवत आहेत. अशाच काही मल्टिस्टार चित्रपटांच्या मांदियाळीवर एक नजर...
१. वजीर
अभिनयाचे शहेनशहा बिग बी आणि युवकांचा फेव्हरेट फरहान अख्तर या दोघांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्माता विधू विनोद चोप्रा व दिग्दर्शक बिजॉय नांबियारने दोघांना एकत्र घेऊन ‘वजीर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदिती राव हैदरी, नील नितीन मुकेश आणि जॉन अब्राहमसुद्धा यामध्ये दिसणार आहेत. हा एक अॅक्शन थ्रिलर असून अमिताभ आणि फरहानच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
२. दिल धडकने दो
गेल्या वर्षी झोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’मध्ये अनेक कलाकार मंडळींचा भरणा होता. रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, फरहान अख्तर, राहुल बोस, शेफाली शहा अशी तगडी स्टारकास्ट यामध्ये होती. अतिश्रीमंत पंजाबी कुटुंब आणि त्यांच्या मित्रपरिवारातील हेवेदावे आणि नातेसंबंधावर आधारित हा चित्रपट स्टारपॉवरमुळे भाव खाऊन गेला. विशेष म्हणजे, झोयाचा ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ हा चित्रपटसुद्धा मल्टिस्टार होता.
३. हॅपी न्यू ईअर
शाहरूख खानने अनेक मल्टिस्टार सिनेमांत काम केले आहे (उदा. कभी खुशी कभी गम, मोहब्बतें). अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडीचे मिश्रण असलेल्या फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू ईअर’मध्ये अभिषेक बच्चन, सोनू सूद, दीपिका पदुकोण, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ, विवान शहा यांनी मिळून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. मसाला चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या फराह खानच्या ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’ या चित्रपटांतही एकापेक्षा जास्त कलाकार होते.
४. फाइंडिंग फेनी
खूप वर्षांपूर्वी हरवलेले प्रेम शोधायला निघालेल्या प्रेमवीरांची रोड ट्रिप ‘फाइंडिंग फेनी’मध्ये दिसली. दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, पंकज कपूर, डिंपल कपाडिया आणि नसिरुद्दीन शहा यांसारख्या तोडीस तोड कलाकारांची फौज हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. मूळ इंग्रजी भाषेतून आलेला हा सिनेमा हिंदीमध्येही डब करण्यात आला होता.
५. गोलमाल सीरिज
रोहित शेट्टीचे ट्रेडमार्क असलेले ‘गोलमाल’, ‘गोलमाल २’ आणि ‘गोलमाल ३’ हे सर्व चित्रपट मल्टिस्टार आहेत. अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, मिथून चक्रवर्ती, करीना कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू अशा अनेक कलाकारांचा ताफा प्रेक्षकांना लोटपोट करण्यास पुरेसा आहे. अजय देवगणला कॉमेडी अॅक्टर म्हणून ओळख देण्यामागे गोलमाल सीरिजचा फार मोठा वाटा आहे.