पंजाबच्या पुत्राला महाराष्ट्राच्या आईने दत्तक घेतले - धर्मेंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:58 IST2018-05-01T06:58:30+5:302018-05-01T06:58:36+5:30

पंजाबच्या पुत्राला महाराष्ट्राच्या आईने दत्तक घेतले, या घटनेला ६०वर्षे झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राशी आयुष्यभर कृतज्ञ राहीन, केवळ मलाच नव्हे, तर माझ्यानंतरच्या पिढ्यांनाही या भूमीने आपलेसे केले

Mother of Punjab adopted Mother of Maharashtra - Dharmendra | पंजाबच्या पुत्राला महाराष्ट्राच्या आईने दत्तक घेतले - धर्मेंद्र

पंजाबच्या पुत्राला महाराष्ट्राच्या आईने दत्तक घेतले - धर्मेंद्र

मुंबई : पंजाबच्या पुत्राला महाराष्ट्राच्या आईने दत्तक घेतले, या घटनेला ६०वर्षे झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राशी आयुष्यभर कृतज्ञ राहीन, केवळ मलाच नव्हे, तर माझ्यानंतरच्या पिढ्यांनाही या भूमीने आपलेसे केले आहे. केवळ चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज मी ८२ वर्षांचा चिरतरुण आहे, अशी कृतज्ञतापूर्वक भावना ज्येष्ठे अभिनेते धर्मेंद्र यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना सोमवारी नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियाच्या स्टेडियममध्ये प्रदान करण्यात आला. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे होते. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र, गतवर्षीचे पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सांस्कृतिक खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना तर ‘चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्कार पाच लाख रुपयांचा, तर ‘विशेष योगदान’ पुरस्कारांचे स्वरूप तीन लाख रुपये असे आहे. या सोहळ्यात ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले.
पडद्यामागेही ‘ती’ यशस्वीच - मृणाल कुलकर्णी
पडद्यासमोर जितके महिला कलाकारांचे योगदान आहे, तितकेच पडद्यामागे काम करणाऱ्या महिलांचेही आहे, हे या पुरस्काराने अधोरेखित केले. पडद्यामागची ‘ती’ही यशस्वीच आहे, यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात पडद्यामागे काम करणाºया महिलांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारते.
प्रवास बाकी - विजय चव्हाण
पुरस्कार मिळाल्याचा फोन आला, तेव्हा विश्वास बसत नव्हता. अभिनयाची नव्हे, तर केवळ नकला करायची आवड होती. बाबांच्या बळजबरीमुळे ‘संभाजी’ची भूमिका केली होती, त्या पहिल्याच अभिनयाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. तेव्हापासून आजतागायत काम सुरू आहे, प्रवास संपला नाही बाकी आहे. पुढच्या वेळी तावडे मुख्यमंत्री होतील आणि मुख्यमंत्री राष्ट्रपती होतील, त्या वेळेसही पुरस्कार स्वीकारण्यास येणार, अशी मिश्कील भावना व्यक्त केली.
एवढ्यात निवृत्ती नकोय - राजकुमार हिराणी
पुरस्कार म्हटलं की, निवृत्तीची वेळ जवळ आली असे वाटते. मात्र, एवढ्यात निवृत्ती नकोय, खूप पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे योगदानासाठी मिळालेला पुरस्कार महत्त्वाचा आहे.

‘वीरूगिरी’ भलतीच फेमस - मुख्यमंत्री
धर्मेंद्र यांनी ‘शोले’मध्ये केलेली टाकीवर चढून केलेली ‘वीरूगिरी’ भलतीच फेमस झाल्याचा हास्यापद किस्सा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितला. ते म्हणाले, हल्ली कुणीही येत आणि टाकीवर चढून आंदोलन करत. त्या वेळेस आम्हाला ते मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ही ‘वीरूगिरी’ कायमचीच चाहत्यांच्या पसंतीची आहे.

Web Title: Mother of Punjab adopted Mother of Maharashtra - Dharmendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.