मराठी गाण्यांनीही पाडली रसिकांना भुरळ
By Admin | Updated: December 31, 2015 03:43 IST2015-12-31T03:43:08+5:302015-12-31T03:43:08+5:30
२०१५ हे वर्ष जसे मराठी चित्रपटांनी गाजले आणि अभिनेता-अभिनेत्रींच्या अभिनयाने सजले; तसेच ते मराठी गाण्यांनीदेखील गाजवले. या वर्षातील मराठी गाण्यांनी तरुणाईला वेडच लावले नाही

मराठी गाण्यांनीही पाडली रसिकांना भुरळ
२०१५ हे वर्ष जसे मराठी चित्रपटांनी गाजले आणि अभिनेता-अभिनेत्रींच्या अभिनयाने सजले; तसेच ते मराठी गाण्यांनीदेखील गाजवले. या वर्षातील मराठी गाण्यांनी तरुणाईला वेडच लावले नाही, तर मोबाइल, कॉम्प्यूटरमध्येसुद्धा त्यांना बॉलीवूडच्या तुलनेत पसंतीसह जागा मिळाली. आजवरच्या मराठी चित्रपटांचा इतिहास पाहता मराठी गाण्यांचा नव्या पिढीला विशेष गंध नसायचा; पण हल्ली मराठी चित्रपटाचे यश पाहता काहीशा गाण्यांमुळे चित्रपट हिट ठरल्याचे दिसते. वर्षाची सुरुवात समाधानकारक झाली नसली, तरी शेवट मात्र मराठी चित्रपटातील गाण्यांनीं ‘गोड’ केला. अगदी शास्त्रीय संगीतापासून रोमॅन्टिक किंवा धागडधिंगा घालणाऱ्या गाण्यांनीही रसिकांना भुरळ घातली. जसे की ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘घेई छंद मकरंद’, ‘सूर निरागस हो’, ‘सुरत पिया की’ या गाण्यांना तर प्रेक्षकांनी अगदी काळजातच साठवून ठेवले. याशिवाय प्रेमातच पाडणाऱ्या दगडी चाळमधील धागा धागा, मुंबई-पुणे-मुंबई २ मधील साथ दे तू मला... या सुपरहिट गाण्यांनी ‘रिंगटोन’ची जागा मिळविली. यातच मराठी लोकांना लग्नसराई असो किंवा गणपती विसर्जन असो, यासाठी एक तर नवीन, हटके व जल्लोषपूर्ण गाणे डान्स करायला लागतेच. ही जागा भरून काढली ती पोपट पिसाटला, ओ मारिया, गुलाबाची कळी, बँड बाजा, मोरया, तुझ्या रूपाचं चांदणं या गाण्यांनी.
यंदाच्या तुलनेत गतवर्षी चित्रपट प्रदर्शनाचे प्रमाणच कमी असल्याने गाणीदेखील मोजकीच हिट झाली होती. मागील वर्षी फक्त शिट्टी वाजली व ही पोरी साजूक तुपातली याच गाण्याने प्रेक्षकांना खूश केले, तर लय भारीमधील माउली माउली व आला होळीचा सण या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. २०१५ ने मात्र ही कसर भरून काढली... आणि एक से एक बढकर गाण्यांचा नजराणा रसिकांसमोर पेश झाला... त्या गाण्यांमध्ये रसिक स्वत:ला हरवून बसले.