दिग्दर्शन हे माझे पहिले प्रेम
By Admin | Updated: August 11, 2016 03:44 IST2016-08-11T03:44:45+5:302016-08-11T03:44:45+5:30
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेत प्रसाद ओक महात्मा जोतिबा फुलेंची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच कच्चा लिंबू या त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे

दिग्दर्शन हे माझे पहिले प्रेम
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेत प्रसाद ओक महात्मा जोतिबा फुलेंची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच कच्चा लिंबू या त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्याच्या या मालिकेबद्दल आणि दिग्दर्शनाच्या नव्या इनिंगबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेद्वारे चिन्मय मांडलेकरने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले आहे. चिन्मयच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तू असतोस, या प्रोजेक्टमध्येही तू आहेस, चिन्मय तुला लकी चार्म मानतो असे तुला वाटते का?
- चिन्मयचा मी लकी चार्म आहे असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. चिन्मयने लिहिलेल्या ‘क्षण’ या पहिल्या चित्रपटात मी काम केले होते. त्यानंतर ‘अवघाची संसार’ या मालिकेत आमची जोडी जमली. ‘बेचकी’ या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात मी काम करत आहे. तसेच मी दिग्दर्शित करत असलेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाची कथाही चिन्मयची आहे आणि आता चिन्मयची निर्मिती असलेल्या पहिल्या मालिकेत मी काम करत आहे. चिन्मय आणि मी अनेक वर्षे एकमेकांसोबत काम करत आहोत. आमचे एकमेकांसोबत हे सहावे प्रोजेक्ट आहे. आमची मैत्री अतिशय घट्ट आहे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत काम करायला खूप मजा येते.
जोतिबा फुलेंची व्यक्तिरेखा तू साकारशील का, असे ज्या वेळी तुला विचारण्यात आले, त्या वेळी तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
- जोतिबा फुले यांची व्यक्तिरेखा मीच का साकारावी असे तुला वाटते, असा पहिला प्रश्न मी चिन्मयला केला होता. या मालिकेत काम करण्यापेक्षा या मालिकेचे दिग्दर्शन करायला आवडेल, असेही मी त्याला सांगितले. पण या भूमिकेसाठी आवश्यक असलेला आक्रमकपणा माझ्यात आहे, त्यामुळे केवळ मीच या भूमिकेसाठी योग्य आहे असे चिन्मयचे मत असल्याने मी ही मालिका करण्याचे ठरवले. कोणत्याही भूमिकेसाठी आधी अभ्यास करावा असे मानणारा मी नट नाही. कॅमेऱ्यासमोर गेल्यावर तुम्ही जो काही उत्स्फूर्त अभिनय करता, तोच तुम्हाला दाद मिळवून देतो असे मला वाटते आणि त्यातही या मालिकेची कथा, संवाद चिन्मयने अतिशय अभ्यास करून लिहिले आहेत. त्यामुळे मला पडद्यावर माझी भूमिका कशाप्रकारे सादर करायची आहे याची मला चांगलीच कल्पना होती. चिन्मय संवाद इतके सुंदर लिहितो, की ते कधीच पाठ करावे लागत नाहीत. ही मालिका करताना आम्ही एखादा चित्रपटच करत आहोत असेच आम्हाला वाटत होते.
या मालिकेत तुझा लूक खूप वेगळा आहे. तसेच तू वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तिरेखांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेस, याविषयी काय सांगशील.
- एकाच मालिकेत वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींची भूमिका साकारायला मिळाल्याचा मला आनंद आहे. महात्मा फुले यांचे ३0-७0 अशा वयोगटातील आयुष्य प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक वयोगटातील मेकअप हा वेगवेगळा आहे. या मालिकेत मी एकूण चार गेटअपमध्ये वावरलो आहे. माझा सर्वात शेवटचा गेटअप मला सर्वात जास्त आवडला. जोतिबा फुलेंचे महान कार्य मला या मालिकेद्वारे लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. जोतिबा फुले यांचा जन्म अठराव्या शतकातला असला, तरी त्यांचे विचार हे अतिशय पुढारलेले होते. त्यांच्याकडून आजच्या पिढीने खूप काही शिकण्याची गरज आहे.
कच्चा लिंबू या चित्रपटाद्वारे तू दिग्दर्शन क्षेत्रात येत आहेस, या चित्रपटाचा तुझा प्रवास कसा होता?
- पाच-सहा वर्षांपूर्वी ‘हाय काय नाय काय’ या चित्रपटाचे मी आणि पुष्कर श्रोतीने मिळून दिग्दर्शन केले होते. पण कच्चा लिंबू हा मी एकटा दिग्दर्शित करत असलेला पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात एका सामान्य कुटुंबाची असामान्य कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शन करण्याची माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती. पण नव्या दिग्दर्शकाला निर्माता मिळणे खूप कठीण असते. मंदार देवस्थळीने कथा वाचताच लगेचच निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि माझे दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
अभिनेता असताना तू दिग्दर्शन करण्याचा विचार कसा केलास?
- मी दिग्दर्शक बनण्यासाठीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो होतो. पण मला खूप चांगल्या भूमिका मिळत गेल्या आणि मी अभिनयाकडे वळलो. अभिनयात स्वत:चे नाव कमावल्यानंतर आता मी माझ्या पहिल्या प्रेमाकडे वळत आहे. मी कधीही अभिनय करण्यापेक्षा दिग्दर्शन करणे अधिक एन्जॉय करतो.
तू गायनाची एक स्पर्धा जिंकली आहेस, एक गायक म्हणून पुन्हा तू प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार आहेस?
- मला गायनाची आवड आहे. पण गाणे गाण्याचा वगैरे माझा काहीही विचार नाही. गायनाच्या स्पर्धेच्या वेळीदेखील माझ्यासोबत असलेले सगळे स्पर्धक हे अनेक वर्षे गायन शिकलेले होते. त्यामुळे मी स्पर्धेत भाग न घेण्याचेच ठरवले होते. पण माझ्या पत्नीने त्या वेळी मला गाण्यास प्रोत्साहन दिले. तिच्यामुळेच मी ती स्पर्धा जिंकू शकलो होतो.