लांब वळसा घेणारा ‘शॉर्टकट’
By Admin | Updated: August 9, 2015 00:14 IST2015-08-09T00:14:04+5:302015-08-09T00:14:04+5:30
सायबर गुन्हा या विषयावर चित्रपट निघू शकतो यावर सहजासहजी विश्वास बसत नसला तरी ‘शॉर्टकट’ या चित्रपटाने मात्र असा विश्वास ठेवण्यास भाग पाडले आहे. ‘हॅकिंग’ या विषयाला केंद्रस्थानी

लांब वळसा घेणारा ‘शॉर्टकट’
- राज चिंचणकर
‘शॉर्टकट’मराठी चित्रपट..
सा यबर गुन्हा या विषयावर चित्रपट निघू शकतो यावर सहजासहजी विश्वास बसत नसला तरी ‘शॉर्टकट’ या चित्रपटाने मात्र असा विश्वास ठेवण्यास भाग पाडले आहे. ‘हॅकिंग’ या विषयाला केंद्रस्थानी ठेवून हा ‘शॉर्टकट’ आपल्या माहितीत बरीच भर घालत जातो आणि या जाळ्यात काही माणसांना कसे वापरून घेतले जाते, यावरही प्रकाश टाकतो. एकूणच हा मुद्दा तसा चांगला आहे; पण त्याची मांडणी अजून ठोस झाली असती तर बऱ्यापैकी लांब वळसा घालणारा हा ‘शॉर्टकट’ चांगल्या मार्गी लागला असता.
आत्मविश्वासाचा अभाव असलेला रोहित कॉम्प्युटरमधला किडा आहे आणि आपली कुठेतरी दखल घेतली जावी, या भावनेने तो पछाडलेला आहे. कॉम्प्युटर सायन्स शिकण्यासाठी एका कॉलेजमध्ये तो प्रवेश घेतो आणि तिथल्या इशिका या विद्यार्थिनीच्या तो प्रेमात पडतो. तिच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी तो थेट एक साइट हॅक करतो आणि पुढेपुढे तो याच प्रकारात वाहावत जात पक्का हॅकर बनतो. या प्रकारातून त्याच्या हातून काही सायबर गुन्हे घडतात आणि इन्स्पेक्टर निंबाळकर यांच्या सापळ्यात रोहित सापडतो. यातून बाहेर पडण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात आणि एका क्षणी थेट निंबाळकरच त्याला मदत करतात. हा या चित्रपटाचा टर्निंग पॉइंट आहे आणि या वळणावरून चित्रपट बरेच काही अचाट प्रकार समोर ठेवतो.
हरीश राऊत यांच्या या कथेला त्यांनीच दिग्दर्शकीय टच दिला आहे. सायबर गुन्ह्यासारख्या गंभीर विषयाला त्यांनी प्रेमाचा तडका देत मनोरंजनाची भट्टी जुळवून आणण्याचा प्रयास केला आहे. पण योग्य पटकथेच्या अभावी हा ‘शॉर्टकट’ बराच पसरट झाला आहे. बराचसा मसाला एकत्र आणताना चित्रपटाची पकड सुटली आहे आणि त्यामुळे या चित्रपटातून एक भरकटलेपणाचा अनुभव गाठीशी जमा होत जातो. वैभव तत्त्ववादी (रोहित), संस्कृती बालगुडे (इशिका) व राजेश शृंगारपुरे (इन्स्पेक्टर निंबाळकर) या तिघांनी चांगले ते देण्याचा आटोकाट प्रयत्न चित्रपटात केलेला दिसतो. वैभवने त्याची भूमिका चांगली वठवली आहे आणि एक आश्वासक व्यक्तिरेखा त्याने साकारली आहे. संस्कृतीला अत्यंत माँड लूक देऊन हा चित्रपट मसालापट असल्याचे बिंबवण्याचा अट्टाहास केल्याचे स्पष्ट होते. मात्र असे असले तरी तिने तिच्या भूमिकेत चांगले रंग भरले आहेत.
राजेश शृंगारपुरेला यात फार काही करण्यास वाव नव्हता आणि त्याने त्याच्या वाट्याला आलेले प्रसंग निभावून नेले आहेत. एक चांगला विषय हाती असताना त्यात मसाला ठासून भरण्याच्या नादात हा चित्रपट पसरट होत गेला आहे; मात्र हॅकिंगसारखा विषय पडद्यावर आणण्याचे श्रेय मात्र या चित्रपटाला नक्की जाईल.