‘लोकमत आपले बाप्पा’

By Admin | Published: September 20, 2015 12:27 AM2015-09-20T00:27:41+5:302015-09-20T00:27:41+5:30

गणेशोत्सवाची नवीन ओळख बनलेल्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमात आगामी ‘बाजीराव- मस्तानी’तील गजानन सॉँगचे लॉँच करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांनी साकारलेल्या

'Lokmat your Bappa' | ‘लोकमत आपले बाप्पा’

‘लोकमत आपले बाप्पा’

googlenewsNext

उपक्रमात बाजीराव - मस्तानीतील गणेश आरतीचे लॉँच

गणेशोत्सवाची नवीन ओळख बनलेल्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमात आगामी ‘बाजीराव- मस्तानी’तील गजानन सॉँगचे लॉँच करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भव्य गणेशाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोन यांनी आरती गायली. रणवीर सिंहने प्रचंड उत्साहात ढोल वाजवायला सुरुवात केली आणि संपूर्ण शिवछत्रपती क्रीडा संकुल ‘लोकमत आपले बाप्पा’च्या जयघोषात निनादून गेले.
सिद्धिविनायक ग्रुप प्रस्तुत संजय घोडावत ग्रुप सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत पुण्यातील विविध शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी गणेशाचा भव्य कोलाज साकारला. या उपक्रमामध्ये ‘बाजीराव मस्तानी’तील गणेशाची आरती लॉँच करण्यात येणार होती. मात्र, सकाळी खराब हवामानामुळे रणवीर आणि दीपिकाला लोणावळ्यातूनच हेलिकॉप्टरने परत फिरावे लागले. मात्र, हजारो विद्यार्थी आणि गणेशभक्तांचा उत्साह आणि पुण्याच्या भूमीत ‘लोकमत’च्या उपक्रमातच गणेश आरतीचे लॉँच करण्याचा रणवीर - दीपिकाचा आग्रह यामुळे ‘लोकमत’ने खास प्रायव्हेट हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. लोहगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरची व्यवस्था करून दोघांनाही म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आणण्यात आले. संपूर्ण आसमंत या ढोलताशा वादनाने दुमदमून गेला. या उत्साहाच्या वातावरणातच ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गणेशाची आरती सुरू झाली. थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुण्याच्या भूमीत गणेश आरती लॉँच करण्याचे समाधान आगळेच असल्याची भावना दोन्हीही कलाकारांनी व्यक्त केली.

रणवीर- दीपिकाचे आगमन झाले आणि क्रीडा संकुलात एकच उत्साहाचे वातावरण संचारले. ‘लोकमत आपले बाप्पा’चा जयघोष होऊ लागला. शेकडो मोबाइल या दोघांची छबी टिपण्यासाठी लखलखू लागले. पिंपरी-चिंचवड ढोल- ताशा महासंघाचे शेकडो वादक देहभान हरपून ढोलवादन करू लागले. हे पाहून रणवीर सिंहच्या उत्साहाला उधाण आले. एक ढोल कमरेला अडकवून तोही ढोलवादन करू लागला अन् दीपिकाही त्याला प्रोत्साहन देऊ लागली.

रणवीरची ‘आपले बाप्पा’मधील पोस्ट झाली व्हायरल
‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमातील गणेशभक्तांचा उत्साह पाहून रणवीर सिंह भारावून गेला. ढोल वाजविताना त्याने अनुभवलेला प्रत्येक क्षण त्याने फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला. रणवीरचा हा वेगळाच अवतार सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल झाला आहे. अनेक जण तो लाइक करीत आहेत.

ढोलाच्या तालावर नाचला रणवीर
डोक्यावर काळ्या रंगाची गोल हॅट, पीळदार मिश्या आणि अंगात ग्रे रंगाची शर्ट-पँट परिधान करून अभिनेत्री दीपिका पदुकोणसमवेत व्यासपीठावर येतानाच, मैदानात वाजणाऱ्या ढोल-ताशांच्या गजरात रणवीर सिंगने ठेका धरला. त्याच्या आगमनानंतर मैदानावर एकच जल्लोष झाला. तर ढोल-ताशांच्या आवाजाने मैदान दुमदुमून गेले. त्यानंतर व्यासपीठावर असलेल्या रणवीरला ढोल वाजविण्याचा मोह आवरला नाही. त्याच्यासाठी एक ढोल व्यासपीठावर मागविण्यात आला. या वेळी त्याने ढोल कंबरेला बांधून ढोल-ताशा पथकाच्या वादनासमवेत वादन केले. सुमारे १० मिनिटे रणवीरने आपल्या कंबरेला ढोल बांधला होता. या वेळी त्याने हात उंचावून अभिवादन केले. या वेळी दीपिकानेही हातात टिपरू घेऊन दुसऱ्या बाजूने रणवीरला साथ दिली. त्याला उपस्थितांनी जोरदार जल्लोष करून दाद दिली. या वेळी बाप्पांची आरतीही करण्यात आली.


‘छैया.. छैया..’वर थिरकली तरुणाई
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला. छैया..छैया.., आजा आजा दिल निचोडे... हॅप्पी बडे टू यू ... ही गाणी त्यांनी सादर केली. तर या वेळी उपस्थित स्वप्निल नावाच्या वादकाने सादर केलेल्या शिटी वाजली या गाण्यावर सुखविंदर सिंगनेही ठेका धरला. सिंग यांनी याप्रसंगी उपस्थित मुलांना व्यासपीठावर बोलावून त्यांनाही ठेका धरायला लावत धमाल उडवून दिली.
प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचे आणि गणेशोत्सवाचे नातेच अजोड. हे दोघेही या उपक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या केवळ उपस्थितीनेच गणेशभक्तांमध्ये उत्साह संचारला. गणपती बाप्पांच्या गाण्यांचे मुखडे गाण्यास त्यांनी सुरुवात केली आणि वातावरण गणेशमय होऊन गेले. या वेळी अजय- अतुल म्हणाले, ‘‘गणपती बाप्पांचा कार्यक्रम पुण्यात आणि तोही ‘लोकमत’ने आयोजित केला असल्याने मुंबईतील रेकॉर्डिंगचा कार्यक्रम टाळून आम्ही येथे उपस्थित राहिलो. या उपक्रमात सहभागी झाल्याचे समाधान आहे.

ढोल-ताशा पथकांनी वाढविली रंगत
या विश्वविक्रमी कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड ढोल-ताशा पथक महासंघाकडून आलेल्या पथकांनी चांगलीच रंगत वाढविली. एकीकडे गणरायांचे कोलाज साकारले जात असताना, दुसरीकडे गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादाने सर्व मैदान थरारून निघाले. तर विक्रमी गणराय साकारताच या पथकांनी केलेल्या जल्लोषाने आसमंत दुमदुमून गेला. यात सह्याद्री, मातृभूमी, शिवतांडव, संघर्ष तसेच वनराज्य या पथकांच्या तब्बल ३५० वादकांनी सहभाग घेतला होता. महासंघाचे अध्यक्ष अमर कापसे यांच्यासह सल्लागार अमित गायकवाड या वेळी उपस्थित होते. या वेळी मातृभूमी पथकातील अवघ्या साडेचार वर्षांच्या सोहम् सालपेकर याच्या ताशावादनाने उपस्थितांनी ठेका धरला.

Web Title: 'Lokmat your Bappa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.