खरपूस विनोदाचा संवादी आविष्कार

By Admin | Updated: August 9, 2015 00:10 IST2015-08-09T00:10:14+5:302015-08-09T00:10:14+5:30

घरोघरी मातीच्या चुली, अशी म्हण आहे आणि ती बहुतांश वेळा खरी ठरल्याचा प्रत्यय येतो. शेजारच्या घरात चुकून कधी डोकावल्यास 'अरे, यांचेही आपल्यासारखेच आहे की', याचा अचानक

Interactive inventions of rabbit humor | खरपूस विनोदाचा संवादी आविष्कार

खरपूस विनोदाचा संवादी आविष्कार

तिसरी घंटा
-  राज चिंचणकर

नाटक : 'लग्नलॉंजी'

घरोघरी मातीच्या चुली, अशी म्हण आहे आणि ती बहुतांश वेळा खरी ठरल्याचा प्रत्यय येतो. शेजारच्या घरात चुकून कधी डोकावल्यास 'अरे, यांचेही आपल्यासारखेच आहे की', याचा अचानक साक्षात्कार होतो आणि या म्हणीचा तंतोतंत अनुभव येतो. या प्रकाराला नवरा-बायकोचे नातेही अपवाद नाही. 'लग्नलॉंजी' या नाटकाने अगदी याच नात्याचे कोडे उलगडत खरपूस विनोदाचा संवादी आविष्कार सादर केला आहे.
या नाटकाची गोष्ट अगदी साधी-सरळ आहे. सुहास आणि सुनिधी प्रेमात पडून पुढे विवाहबंधनात अडकतात आणि त्यांचा संसार सुरू होतो. लग्नानंतरचे काही दिवस अगदी फुलपाखरासारखे स्वच्छंदपणे दोघे व्यतीत करतात. पण नव्याची नवलाई ओसरल्यावर त्यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून कुरबुरी सुरू होतात. या अंतर्गत टिपिकल चार घरांमध्ये जे संवाद घडतात, त्याचीच री इथेही ओढली जाते. वादविवाद, खटके, भांडणे, रुसवेफुगवे या सगळ्यांची भेळ या दोघांच्या नात्यात होत जाते आणि त्यांच्यात विसंवादाला प्रारंभ होतो. पुढे एक लॉंजिकल उत्तर देत या नाटकाचा पडदा पडतो.
सुनील हरिश्चंद्र लिखित हे नाटक केवळ नवरा-बायकोच्या वादात गुरफटत नाही; तर त्यामागचे लॉंजिकही समोर ठेवते. त्यासाठी लेखकाने स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेचा दाखला दिला आहे. समानतेचा अट्टहास केला, तरी मुळातच या दोघांच्या विचार करण्याच्या पद्धतीत व क्षमतेत तफावत आहे, यावरही हे नाटक प्रकाश टाकते. खटकेबाज संवाद आणि संहितेचा प्रवाहीपणा हे या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
एकंदर हा विषय तसा गंभीर असला, तरी दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर यांनी संहितेबरहुकूम तो हलक्याफुलक्या रीतीने हाताळला आहे. त्यामुळे या नाटकाला मनोरंजनाची डूब आपसूकच प्राप्त झाली आहे. त्यादृष्टीने त्यांनी हा खेळ चांगला रंगवला आहे; पण यातले काही प्रसंग साधारण पातळीवर रेंगाळतात आणि कुठलीही आडवळणे न घेता सरळमार्गी सादर होत जातात. प्रमुख पात्रांसोबत यात असलेल्या सूत्रधाराचा वावर आटोपशीर होणे गरजेचे होते. मात्र कलावंतांना भूमिकेचे बेअरिंग सोडून प्रेक्षकांशी अधूनमधून थेट संवाद साधण्याची दिलेली मोकळीक, रंगमंच आणि प्रेक्षागृहातले अंतर कमी करून त्यांच्यात एकप्रकारचा आपलेपणा निर्माण करते. परिणामी, नाटक प्रेक्षकांनाही या प्रयोगात सामावून घेते.
अभिनयाच्या पातळीवर हे नाटक मस्त रंगले आहे. सुहासची भूमिका संतोष जुवेकरने अगदी सहज, हसतखेळत, पण विलक्षण गांभीर्याने रंगवली आहे. बायकोशी उडणारे खटके असोत, दारू पिऊन आल्यानंतरचा प्रसंग असो किंवा प्रेक्षकांशी गुजगोष्टी करण्याचा खेळ असो, संतोषने ही कामगिरी लीलया पार पाडली आहे. अभिज्ञा भावे हिने यातल्या सुनिधीचे सगळे विभ्रम उत्तम पेश केले आहेत. सहजसुंदर अभिनयाचे दर्शन तिने यात घडवले आहे. सूत्रधाराच्या भूमिकेत सुदेश म्हशीलकर यांनी योग्य ते रंग भरण्याचे काम केले आहे.
नाटकाची सगळी तांत्रिक अंगे चांगली जुळून आली असून, ती यातल्या नाट्याला पूरक आहेत. एकूणच, नाटक पाहायला जावे आणि त्याचा आस्वाद घेताना 'अरेच्च्या, ही तर आपल्याच घरातली स्टोरी', असे वाटण्याइतपत त्या गोष्टीशी एकरूप व्हावे, याचा खात्रीलायक अनुभव देण्याची कामगिरी मात्र या नाटकाने केली आहे.

Web Title: Interactive inventions of rabbit humor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.