अभिनेते शेखर सेन यांचा सन्मान
By Admin | Updated: November 9, 2015 02:26 IST2015-11-09T02:26:40+5:302015-11-09T02:26:40+5:30
‘कुमार गंधर्व फाउंडेशन’ ही संस्था कुमार गंधर्वांचे एक शिष्य डॉ. परमानंद यादव यांनी मुंबई शहरात स्थापन करून नावारूपाला आणली आहे

अभिनेते शेखर सेन यांचा सन्मान
‘कुमार गंधर्व फाउंडेशन’ ही संस्था कुमार गंधर्वांचे एक शिष्य डॉ. परमानंद यादव यांनी मुंबई शहरात स्थापन करून नावारूपाला आणली आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी संगीताच्या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत पुरुषोत्तम जलोटा, दामोदर कृष्ण दातार, प्रभाकर कारेकर वगैरे मान्यवरांना हा पुरस्कार मिळाला आहे. यंदाचा पुरस्कार शेखर सेन यांना देण्यात आला. शेखर सेन हे गायक आणि अभिनेता या दोन्ही गुणांमुळे देशवासीयांना परिचित आहेत. कबीर तुलसी, विवेकानंद इत्यादी व्यक्तिमत्त्वांवर आधारित त्यांनी एकपात्री प्रयोग केले आहेत आणि त्यांची संख्या आता नऊशेच्या घरात पोहोचली आहे.
शेखर सेन यांनी त्यांच्या नाट्यसंहिता लिहिल्या आहेत. याशिवाय गायन, संगीत दिग्दर्शन वगैरे सर्व बाजू सांभाळल्या आहेत. त्यांचे आईवडील म्हणजे अरुण कुमार सेन आणि अनिता सेन हे दोघेही ग्वाल्हेर परंपरेचे गायक कलाकार आणि अध्यापक. तोच वारसा शेखर सेन यांनी पुढे समर्थपणे चालवला आहे. त्यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम परवा नेहरू केंद्रात पार पडला. रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत शेखर सेन यांंनी हा सन्मान अभिनेता रघुवीर यादव यांच्या हस्ते स्वीकारला आणि कबीरमधला एक प्रवेश आणि गीत उत्स्फूर्तपणे सादर करून रसिकांची दाद मिळविली.
याप्रसंगी महिला तबलावादक मुक्ता रास्ते यांचं एकल तबलावादन झालं. त्यांनी १६ मात्रांचा त्रिताल डौलदारपणे सादर केला. आमोद दंडगे आणि अरविंद मुळगावकर यांच्या या शिष्येने गेल्या पाच वर्षांत चांगलंच नाव कमावलं आहे. पुर्कखाबाद घराण्याच्या अमीर हुसेन खान खाँसाहेबांच्या रचना त्यांनी सफाईने बजावल्या. कुमारांच्या शैलीची त्यांनी मनोभावे सेवा केली आहे. कुमारांच्या गायकीवर एक परिसंवादही आयोजित करण्यात आला होता. त्यात ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर, श्यामरंग शुक्ला, पुण्याच्या गायिका स्मिता देशमुख यांनी कुमारांच्या शैलीचे विश्लेषण केले आणि आपले अनुभवही सांगितले.