नमस्कार मंडळी, काय म्हणता ...
By Admin | Updated: June 23, 2014 09:34 IST2014-06-23T01:56:05+5:302014-06-23T09:34:16+5:30
‘नमस्कार, काय म्हणता? कशी आहात मंडळी? इथे येऊन फार आनंद झाला. बस एवढेच, आता मी पुढे मराठी नाही बोलणार; भीती वाटते मला.’’

नमस्कार मंडळी, काय म्हणता ...
मुंबई : ‘‘नमस्कार, काय म्हणता? कशी आहात मंडळी? इथे येऊन फार आनंद झाला. बस एवढेच, आता मी पुढे मराठी नाही बोलणार; भीती वाटते मला.’’ हे अस्सल मराठमोळे शब्द आहेत बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन हिचे! थेट ‘लोकमत’च्या व्यासपीठावर विद्या बालन अवतरली आणि तिने मराठीत बोलण्यास सुरु वात करीत रसिकांच्या हृदयाला हात घातला. ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘नया आसमान नयी उडान’ या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय सभागृहात विद्या बालन आली होती. तिच्या आगामी ‘बॉबी जासूस’ या चित्रपटात तिने रंगवलेल्या महिला गुप्तहेराच्या भूमिकेविषयी विद्या बालनने या वेळी संवाद साधला.
बॉबी जासूस या चित्रपटाविषयी बोलताना विद्या बालन म्हणाली, ही केवळ गुप्तहेराची कहाणी नाही, तर एका मुलीचीही कहाणी आहे. ही मुलगी हैदराबादच्या एका मोहल्ल्यात राहणारी आहे आणि एक प्रसिद्ध गुप्तहेर बनावे अशी तिची इच्छा आहे. तिथे राहून छोट्या-मोठ्या समस्या ती सोडवत असते. यातूनच तिला एक मोठी केस मिळते. आपण आतापर्यंत ज्या गुप्तहेरांचे चित्रपट बघत आलो आहोत, तशा प्रकारचा मात्र हा चित्रपट नाही. ही मुलगी अवखळ आहे आणि हा चित्रपट पूर्णत: कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. ही मुलगी रजनी पंडित यांच्यासारखी व्यावसायिक गुप्तहेर नाहीय, तर हे काम शिकणारी ती मुलगी आहे.
करमचंद या गुप्तहेराची जशी किटी ही सेक्रेटरी होती, तशी ‘बॉबी जासूस’ची एक टोळी आहे आणि त्यात केवळ मुलगे आहेत. म्हणजे आता फासे उलटे पडले आहेत. मला कधी अशी भूमिका मिळेल असे वाटले नव्हते; पण आज समाजात सर्वच क्षेत्रांत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात असताना मला महिला गुप्तहेराची भूमिका मिळतेय, हे योग्यच वाटते. म्हणून या चित्रपटात बॉबी ही बॉस आहे आणि तिच्या टोळीत सगळे मुलगे आहेत.
गुप्तहेर हा एक प्रकारचा बहुरूपी असतो. वेष बदलून तो विविध ठिकाणी फिरत असतो. यादृष्टीने एक अभिनेत्री म्हणून या भूमिकेत वैविध्य आहे. या चित्रपटात मला एकूण १२ व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या. त्यातल्या पाच पुरु षांच्या आहेत. पण ही रूपे साकारताना मला जास्त मेहनत करावी लागली नाही़ कारण माझी वेषभूषा आणि रंगभूषा करणारी टीम त्यासाठी अधिक झटत होती. मिश्या, दाढी, बाहेर आलेले दात असे विविध गेटअप मी यात केले. वेषभूषा बदलताच माझा आवाज आणि देहबोली बदलत जायची. दीड ते तीन तास मला प्रत्येक वेषभूषेसाठी लागायचा, पण मी कधी थकले नाही. शूटिंगच्या वेळी मला अनेक जण ओळखू शकत नव्हते. हे क्षेत्र आम्हाला संयम कसा राखायचा ते शिकवते. या चित्रपटासाठी मी हैदराबादी भाषा शिकले. अली फझल हा माझा या चित्रपटात सहकलाकार आहे. त्याने यात चांगले काम केले आहे. त्याची- माझी सहज मैत्री झाली. लखनौची अदब त्याच्यात आहे आणि अभिनयाचे चांगले गुणही त्याच्यात आहेत. बॉबी जासूसच्या निमित्ताने मी एक ब्लॉग सुरू केला आहे. त्यावर आम्ही छोट्या-मोठ्या गोष्टी शेअर करतो. या क्षेत्रातली गॉसिप आम्ही यावर मांडतो. पण कुणाला त्यापासून हानी पोहोचेल, असे काही आम्ही यावर टाकत नाही. बॉबी जासूस या चित्रपटात सर्व वयोगटांतल्या लोकांना हवे असलेले मनोरंजन आहे. ४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. (प्रतिनिधी)