मटकी फोडा... पण सांभाळून
By Admin | Updated: August 25, 2016 02:15 IST2016-08-25T02:15:19+5:302016-08-25T02:15:19+5:30
दहीहंडी हा सण जल्लोषाचा, मौजमस्ती करण्याचा असतो. या दिवशी चौकाचौकात गोपालांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते.

मटकी फोडा... पण सांभाळून
दहीहंडी हा सण जल्लोषाचा, मौजमस्ती करण्याचा असतो. या दिवशी चौकाचौकात गोपालांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तसेच या उत्सवाला कलाकार नेहमीच मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहात असल्याने या उत्सवाला चार चाँद लागतात. दंहीहंडी फोडण्यासाठी एखादे मंडळ आठ थर लावतात तर काही नऊ जण लावण्यासाठी प्रयत्न करतात. थर लावण्याची जणू त्यांच्यात स्पर्धाच लागलेली असते. दहीहंडीच्या बदलत्या स्वरूपाविषयी कलाकारांनी ‘सीएनएक्स’सोबत आपली मते शेअर केली...
संतोष जुवेकर
दहीहंडी हा आता उत्सव न राहता एक स्पर्धा बनली आहे. भविष्यात दहीहंडी प्रिमिअर लीग अशी स्पर्धा जरी सुरू झाली तर त्यात आश्चर्य वाटणार नाही असे मला वाटते. त्यामुळे या गोष्टीवर आताच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दहीहंडी हा सण एक स्पर्धा म्हणून नव्हे तर उत्सव म्हणून साजरा करणे गरजेचे आहे. दहीहंडी फोडण्यासाठी आ़योजक लाखो रुपयांचे बक्षीस देतात. या बक्षिसांच्या अमिषाने गोविंदा अनेक थर रचतात. त्यामुळे आयोजकांनी या गोविंदांच्या संरक्षणाची काळजीदेखील घेणे गरजेचे आहे. तसेच दहीहंडी खेळण्यासाठी वयोमर्यादा ठरवणे आवश्यक आहे. अनेकवेळा अतिशय लहान मुलेदेखील दहीहंडी फोडताना आपल्याला पाहायला मिळतात. तसेच कलाकारांनीदेखील या सणात सहभागी होताना या सणाचे व्यावसायिकरण होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
>सिद्धार्थ चांदेकर
काही मंडळे गोकुळाष्टमी यायच्या कित्येक दिवस आधीपासूनच सरावाला सुरुवात करतात. त्या मंडळांसाठी आठ किंवा नऊ थर रचणे हे कठीण नसते. त्यामुळे ज्या मंडळांना शक्य असेल त्यांनी थर रचावेत असे मला वाटते. पण हे थर रचताना गोविंदानी स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. तसेच दहीहंडी फोडण्यासाठी प्रशिक्षणदेखील घेणे गरजेचे आहे. दहीहंडी या सणामध्ये कोणतीही स्पर्धा नसावी की राजकीय हेतूने हा सण साजरा केला जाऊ नये. दहीहंडी हा सण म्हणून साजरा करावा आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटावा.
>क्रांती रेडकर : दहीहंडी या सणाचे आता बाजारीकरण झालेले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणताही सण साजरा करताना नियम आणि शिस्त पाळणे अतिशय आवश्यक आहे. खरे तर या खेळाकडे एक साहसी खेळ म्हणून पाहाण्याची गरज आहे. हा खेळ खेळण्यासाठी गोविंदाना त्यांच्या मंडळांनी चांगल्या दजार्ची सुरक्षा साधने पुरवण्याचीही गरज आहे. पण गोविंदांच्या सुरक्षिततेकडे प्रचंड दुर्लक्ष केले जाते. आयोजकांना तर आपल्या दहीहंडीला लोकांची गर्दी कशी होईल याचीच चिंता लागलेली असते. आपल्या दहीहंडीला लोकांची अधिक गर्दी व्हावी या उद्देशानेच आयोजक अनेक सेलिब्रेटींना बोलवतात. प्रसिद्ध सेलिब्रेटी आपल्याकडे आली की, आपल्या मंडळाचे नाव जास्त चर्चेत राहील असे त्यांना वाटते. तसेच काही कलाकारदेखील तिथे जाऊन विविध प्रकारची नृत्ये सादर करतात. पण कलाकारांनीदेखील हा सण असून तो पारंपरिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे.
>मृण्मयी देशपांडे : दहीहंडीत कोणते मंडळ सर्वात जास्त थर लावणार याची जणू स्पर्धाच लागलेली असते. खरे तर तीन ते चार थर लावूनदेखील या सणाचा आनंद लुटता येऊ शकतो. थरांची स्पर्धा करण्याची काही गरज आहे,असे मला वाटत नाही. दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना प्रत्येक मंडळांनी नियम आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे. दहीहंडी साजरी करताना अनेकवेळा पाण्याचा अपव्ययदेखील केला जातो. दहीहंडीच काय तर कोणताही सण साजरा करताना पाण्याचा अपव्यय टाळावा असे मला वाटते. केवळ दंहीहंडीमध्येच नव्हे तर उद्घाटनांना, राजकीय रॅलींनादेखील गर्दी खेचण्यासाठी सेलिब्रेटींना बोलवले जाते. यामुळे सेलिब्रेटींची दहीहंडीला असणारी उपस्थिती यावर चर्चा करणे चुकीचे आहे.
>तेजश्री प्रधान : दहीहंडीचा सण जवळ आला की, पथकांवर अनेक बंधने लादली जातात. सगळेच त्यांच्यावर टीका करतात. पण पथकामधील काही गोविंदा स्वत:च्या आर्थिक गरजेसाठी या पथकांमध्ये सहभागी होत असतील याचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच दहीहंडीला कलाकारांनी उपस्थिती लावण्यास काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. अशा सणांमुळे आपल्याला आपल्या चाहत्यांना भेटता येते. अनेकवेळा तर केवळ तुम्हाला भेटण्यासाठी लोक गर्दी करतात. यातून तुम्हाला त्यांचे तुमच्यावर असलेले प्रेम कळते.