फिरंगी इन बॉलीवूड

By Admin | Published: August 4, 2016 01:58 AM2016-08-04T01:58:12+5:302016-08-04T01:58:12+5:30

आॅस्ट्रेलियन खेळाडू ब्रेट ली ‘अनइंडियन’ या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयाच्या इंनिगला सुरुवात करीत आहे.

Firangi In Bollywood | फिरंगी इन बॉलीवूड

फिरंगी इन बॉलीवूड

googlenewsNext


आॅस्ट्रेलियन खेळाडू ब्रेट ली ‘अनइंडियन’ या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयाच्या इंनिगला सुरुवात करीत आहे. ब्रेट लीचा हा चित्रपट आॅस्ट्रेलियात प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे त्याच्या फॅन्सनी कौतुक केले आहे. आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. ब्रेट ली सध्या भारतात असून, मुंबईतील पाऊस एन्जॉय करीत असल्याचे सांगतो. त्याच्या या नव्या इनिंगबाबत त्याने सीएनएक्सशी मारलेल्या गप्पा...
क्रिकेटर असताना अभिनय करण्याचा विचार कसा केलास?
- क्रिकेटर बनण्याचे स्वप्न मी लहानपणापासूनच पाहत होतो. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भरपूर मेहनत घेतली आणि मी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज क्रिकेटमध्ये माझे नाव प्रसिद्ध आहे. मी अभिनय करण्याचा कधी विचार केला नसला तरी मला चित्रपट पाहण्याची प्रचंड आवड होती. मला बॉलीवूडमधून याआधीही अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आल्या होत्या; मी क्रिकेटमध्ये व्यग्र असल्याने नकार दिला होता. अनइंडियन या चित्रपटाची आॅफर आली, त्या वेळी मी क्रिकेटमधूनही निवृत्त झालो होतो. त्यामुळे मी अभिनयाचा विचार केला.
अभिनय आणि क्रिकेट यांमध्ये कोणती गोष्ट कठीण आहे असे वाटते?
-नक्कीच अभिनय करणे. मी कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वी अभिनयाचे धडे गिरवले, तरीही मी चांगला अभिनय करू शकेन का, याची मला शंका होती. सिडनीमध्ये मला अभिनय शिकवण्यासाठी खास लोकांची नेमणूक करण्यात आली होती. चित्रीकरणाच्या सुरुवातीला अभिनय करताना मी नर्व्हस असलो, तरी आता अभिनय करणे ही गोष्ट मला आवडायला लागली आहे.
कॅमेऱ्यासमोर जाण्याचा अनुभव कसा होता?
- मी गेली २० वर्षे क्रिकेट खेळत असल्याने कॅमेरा हा माझ्यासाठी नवीन नाहीये. मी क्रिकेट खेळण्यासोबतच कॉमेंट्री केलेली आहे. तसेच मी काही जाहिरातींमध्येही काम केलेले आहे. त्यामुळे कॅमेऱ्याला सामोरे जाणे माझ्यासाठी नवीन नव्हते; पण चित्रपट करीत असताना तुम्ही दुसरी व्यक्तिरेखा साकारत असता. ती व्यक्तिरेखा आत्मसात करणे, त्या व्यक्तिरेखेप्रमाणेच वागणे या गोष्टी माझ्यासाठी आव्हानात्मक होत्या.
अनइंडियन या चित्रपटाबाबत काय सांगशील?
- मी या चित्रपटाचा दिग्दर्शक अनुपम शर्माला कित्येक वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे मी त्याच्यासोबत खूपच कम्फर्टेबल होतो. त्याच्यावर विश्वास असल्यानेच मी चित्रपटात काम करण्याचे ठरवले होते. चित्रीकरणाच्या वेळी बारीकसारीक गोष्टीदेखील तो मला समजावून सांगत असे. तसेच तनिषा चॅटर्जीकडूनही मला खूप काही शिकायला मिळाले. ती केवळ एक चांगली अभिनेत्रीच नाही, तर एक चांगली व्यक्तीदेखील आहे. या चित्रपटातील इंटिमेट दृश्य चित्रित करायला आधी मी घाबरलो होतो; पण तनिषाने मला खूपच समजून घेतले.
भविष्यात बॉलीवूडमध्ये काम करण्याचा काही विचार आहे का?
- प्रीती झिंटा, शाहरूख खान असे बॉलीवूडमध्ये माझे खूप चांगले मित्रमैत्रीण आहेत. प्रीती, शाहरूख, अमिताभ बच्चन तसेच बॉलीवूड चित्रपटांचा मी मोठा फॅन आहे. अनइंडियन या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहूनच मी बॉलीवूडमध्ये काम करण्याचा विचार करणार आहे. मला हिंदी येत नसल्याने चित्रपटात एखाद्या फिरंगीची भूमिका साकारायला आवडेल. मुझे थोडा-थोडा हिंदी आता है। पण, हे काही शब्द येऊन मी हिंदी बोलू शकत नाही. त्यामुळे मी फिरंगी म्हणूनच चित्रपटात झळकेन, असा विचार केलेला आहे.
तुझ्या क्रिकेटर्स मित्रांचे तुझ्या अभिनयाबद्दल काय म्हणणे आहे?
- हा चित्रपट आॅस्ट्रेलियात प्रदर्शित झाला असल्याने माझ्या आॅस्ट्रेलियातील क्रिकेटर मित्रांनी हा चित्रपट पाहिला आहे. त्यांना माझा अभिनय खूपच आवडला. आता भारतातील माझ्या क्रिकेटर मित्रांनी चित्रपट पाहावा, अशी माझी इच्छा आहे. मी त्यांना नक्कीच चित्रपट पाहण्यासाठी बोलावणार आहे. मी अभिनय करतोय, हे कळल्यावर त्यांना आश्चर्य वाटले.

Web Title: Firangi In Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.