कलाकारांच्या गर्दीत चित्रपट भरकटला
By Admin | Updated: July 5, 2014 09:41 IST2014-07-05T09:40:58+5:302014-07-05T09:41:30+5:30
'बॉबी जासूस' चित्रपटाद्वारे दिया मिर्झाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. सुरुवातीलाच तिने स्त्रीप्रधान विषय निवडला आहे.

कलाकारांच्या गर्दीत चित्रपट भरकटला
>'बॉबी जासूस' चित्रपटाद्वारे दिया मिर्झाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. सुरुवातीलाच तिने स्त्रीप्रधान विषय निवडला आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आपले गुप्तहेर होण्याचे स्वप्न कशाप्रकारे संघर्ष करत पूर्ण करते त्याचे चित्रण चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
गोष्ट हैदराबादची. तिथल्या एका सर्वसाधारण मुस्लीम कुटुंबातल्या बिल्किसला (विद्या बालन) हेरगिरी करण्याची हौस असते. ती बॉबी जासूस या नावाने गुप्तहेर म्हणून काम करते. आपले मोठे नाव व्हावे, अशी तिची इच्छा असते. त्यासाठी एका मोठय़ा संधीचा शोधही ती घेत असते. तिच्या वागण्याला कंटाळून तिचे अब्बा (राजेंद्र गुप्ता) तिच्याशी बोलणेच बंद करतात. मात्र तिची आई (सुप्रिया पाठक) तिला सर्वोतोपरी मदत करते. अशातच तिला एक मोठी संधी मिळते. काही मुलींचा शोध घेण्याचे काम बरेच पैसे देऊन खान (किरण कुमार) तिला देतो. बॉबी आपले सगळे कौशल्य पणाला लावून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण त्याचवेळी काहीतरी चुकीचे होते आहे, असे तिला वाटू लागते. खान त्या मुलींसोबत काही तरी चुकीचे करत आहे, असा संशय आल्याने ती खानवरच लक्ष ठेवते. शेवटी खानचे खरे रूप समोर येते. त्या मुलींची सुटका होऊन चित्रपट संपतो.
उणिवा - पहिल्यांदाच दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या समर शेखने बॉबीच्या हेरगिरीचे कारनामे दाखवणारी एक चांगली कथा निवडली. पण बॉबीचे जग दाखवण्याच्या नादात खूप कलाकार घेतले गेले. त्यांच्या गर्दीमुळे मात्र मूळ कथा भरकटली. पूर्वार्धात बॉबीच्या हेरगिरीचे छोटे छोटे कारनामे कथा पुढे नेण्यास हातभार लावतात. पण उत्तरार्धात मात्र पात्रांच्या गर्दीमुळे चित्रपट भरकटायला सुरुवात होते. त्यामुळे शेवटही गडबडतो. या सगळ्यात कथेवर संतुलनच राहत नाही. बॉबीला हीरो बनवण्याच्या नादात इतरांच्या भूमिकांना योग्य न्याय मिळत नाही. त्यामुळे चित्रपट निराश करतो. तसेच चित्रपटाचे संगीतही वाईट असून एकही गाणे लक्षात राहत नाही.
वैशिष्ट्ये - बॉबीच्या भूमिकेला विद्या बालनने पूर्ण न्याय दिला आहे. खूप प्रभावीपणे तिने ही भूमिका केली आहे. वजन वाढवण्यापासून ते वेगवेगळ्या गेटअपमधून समोर येत विद्याने ही भूमिका रंगतदार करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे कथेपेक्षा विद्याची भूमिकाच छाप पाडण्यात यशस्वी होते. त्याचबरोबर सुप्रिया पाठक, तन्वी आझमी, झरीना वहाब, राजेंद्र गुप्ता, किरण कुमार आणि अरझन बावजा यांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. विद्याच्या प्रियकराच्या भूमिकेतील अली फजलनेही चांगले काम केले आहे. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट चांगला आहे.
का पाहावा ? 'बॉबी जासूस'च्या रूपातील विद्या बालनला पाहण्यासाठी.
का पाहू नये ? कमकुवत कथा, संगीत आणि शेवट पूर्णपणे निराश करतो.