हिट चित्रपटांच्या दिग्दर्शकापासूनही दुरावा
By Admin | Updated: December 30, 2015 03:24 IST2015-12-30T03:24:49+5:302015-12-30T03:24:49+5:30
ज्या दिग्दर्शकासोबत शाहरूख खानचा चित्रपट फ्लॉप होतो, त्यांंच्यासोबत तो पुन्हा काम करत नाही, हे खरे असले तरी ही नाण्याची केवळ एक बाजू आहे. शाहरूख फक्त फ्लॉपच नव्हे

हिट चित्रपटांच्या दिग्दर्शकापासूनही दुरावा
ज्या दिग्दर्शकासोबत शाहरूख खानचा चित्रपट फ्लॉप होतो, त्यांंच्यासोबत तो पुन्हा काम करत नाही, हे खरे असले तरी ही नाण्याची केवळ एक बाजू आहे. शाहरूख फक्त फ्लॉपच नव्हे तर हिट चित्रपटांच्या दिग्दर्शकापासूनही अनेकदा दुरावला आहे. याचे पहिले उदाहरण राजकंवर आहेत, ज्यांनी शाहरूख खानच्या करिअरचा पहिला सुपरहिट चित्रपट ‘दीवाना’ बनविला होता. ‘दीवाना’नंतर राजकंवरच्या दिग्दर्शनातील अजून एक चित्रपट ‘हर दिल जो प्यार करेगा’ (सलमान खान-राणी मुखर्जी-प्रीती झिंटा) यात शाहरूखने पाहुणा कलाकार म्हणून काम केले होते. याशिवाय राजकंवरच्या कोणत्याही चित्रपटात शाहरूखने काम केले नाही. राजकंवर फक्त एकच उदाहरण नाही. अब्बास-मस्तानही या यादीत आहेत. सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटांचे चॅम्पियन म्हटले जाणाऱ्या या दिग्दर्शकाच्या जोडीने शाहरूखसोबत एकापाठोपाठ ‘बाजीगर’ आणि नंतर ‘बादशहा’ बनविला. मात्र दोन्ही चित्रपट हिट होऊनही अब्बास-मस्तानच्या जोडीसोबत शाहरूख खानचे काय बिनसले हे कळायला मार्ग नाही. परंतु ‘बादशहा’नंतर चित्रपटांच्या या बादशहाने कधी त्यांच्या चित्रपटात काम नाही केले. शाहरूख खानच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात दिग्दर्शक राजीव मेहरांनी त्याला खूप साथ दिली. ‘चमत्कार’नंतर ‘रामजाने’ आला. मात्र ‘रामजाने’ हिट झाल्यानंतर शाहरूख खान पुन्हा कधी राजीव मेहरासोबत कोणत्या चित्रपटात काम करताना दिसला नाही. आमीरचे चुलत भाऊ मन्सूर खानसोबत शाहरूखचा चित्रपट ‘जोश’ आला. हा चित्रपट हिट झाला. मात्र पुन्हा मन्सूर खानसोबत शाहरूख कधी एकत्र आला नाही. सुभाष घर्इंनी शाहरूखला ‘त्रिमूर्ती’मध्ये कास्ट के ले. यानंतर ‘परदेस’ आला. पण नंतर काही ही हिट जोडी सोबत आली नाही. ‘स्वदेस’ला शाहरूख खानचा वन आफ बेस्ट चित्रपट मानला जातो. मात्र आशुतोष गोवारीकरसोबत ‘स्वदेस’ नंतर किंग खानने पुन्हा कधी काम केले नाही.