‘शहाणपणा’चे सुसाट धुमशान!
By Admin | Updated: July 14, 2016 01:14 IST2016-07-14T01:14:19+5:302016-07-14T01:14:19+5:30
‘सब कुछ संतोष पवार’ अशी ओळख असलेल्या संतोष पवार यांच्या ‘आलाय मोठा शहाणा’ या नाटकाने २५वा प्रयोगाचा टप्पा पार केलाय.

‘शहाणपणा’चे सुसाट धुमशान!
‘सब कुछ संतोष पवार’ अशी ओळख असलेल्या संतोष पवार यांच्या ‘आलाय मोठा शहाणा’ या नाटकाने २५वा प्रयोगाचा टप्पा पार केलाय. नमुनेदार व्य्ािक्तरेखा, मॅड करणारी धम्माल कॉमेडी, नाटकात घडणाऱ्या विविध घटना, विडंबनात्मक गीते आणि धमाकेदार संगीत यामुळे हे नाटक रसिकांना अक्षरक्ष: वेड लावतेय. रसिकांचे झिंगाट मनोरंजन करणाऱ्या या नाटकाच्या निमित्ताने सीएनएक्सने संतोष पवार यांच्याशी साधलेला हा संवाद.
‘आलाय मोठा शहाणा’ असं आपण गमतीने म्हणतो. मात्र, शीर्षकावरूनच मॅडछाप कॉमेडी वाटतेय, तर यात कोण कोणाला शहाणा करतेय आणि कोण शहाणा ठरतेय?
4वैभव परब लिखित या नाटकाच्या शीर्षकातच त्याचे कथानक दडलेय. वर्षानुवर्षे नववीमध्येच अडकलेल्या एका चंचल विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून देण्याचे मोठे आव्हान त्या विद्यार्थिनीचे वडील एका मास्तरवर सोपवतात. मात्र, इथेच हा मास्तर स्वत:साठी खड्डा खणून घेतो. कारण या काळात कुठल्या मुहूर्तावर आपण मास्तर झालो, अशी भावना त्याच्या मनात डोकावू लागते. त्यामुळेच मग नकळतच यातील इतर कलाकारांच्या ओठावर आपसूकच ‘आलाय मोठा शहाणा’ असे शब्द उमटतात. आता हा मास्तर त्या विद्यार्थिनीला एका दमात दहावी पास करून देण्यात यशस्वी होतो का? त्या दरम्यान, कुठल्या गमती-जमती घडतात, याचे चित्रण म्हणजे ‘आलाय मोठा शहाणा’ हे नाटक..
या नाटकात रसिकांचं धम्माल मनोरंजन तर आहेच. मात्र, यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आलाय, त्याविषयी काय सांगाल...?
4माझ्या नाटकात कॉमेडी असते. मात्र, त्या विनोदालाही काही मर्यादा असतात. माझ्या नाटकातले संवाद किंवा विनोद हे रसिकांचं मनोरंजन करतात. मग ते ‘यदा कदाचित असो’, ‘राधा ही कावरी बावरी’ असो या नाटकात कुठलाही कमरेखालचा विनोद नसतो. प्रत्येक नाटकातून मनोरंजनासह रसिकांपर्यंत काही ना काही संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. आलाय मोठा शहाणा या नाटकातूनही ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.
या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जाणून बुजून या नाटकानंतर संतोष पवार आणि आशिष पवार ही जोडी १३ वर्षांनी एक आलीय. याविषयी आणि नाटकाच्या कलाकारांविषयी काय सांगाल?
4जाणूनबुजून या नाटकानंतर तेरा वर्षांनी एकत्र काम करतोय. आलाय मोठा शहाणा या नाटकाच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय. बोरीवलीत एका नाटकाचे वाचन करायचेय, वेळ आहे का असा फोन एके दिवशी आशिषला केला.. तेव्हा आशिष आला आणि वाचताक्षणी त्याला ते नाटक आवडलं.. मागचा पुढचा विचार न करता त्यानं लगेच या नाटकाला होकार दिला.. या नाटकासाठी कधी सिनेमा करत असेन, तर तोही बाजूला ठेवीन असंही आशिषने सांगितलं.. या नाटकात त्यानं साकारलेला मास्तर तुम्हाला अक्षरक्ष: वेड लावेल.. वरवर सरळमार्गी वाटणारा, मात्र तितकाच अतरंगी नाना कळा असलेला स्मार्ट मास्तर रसिकांना भावलाय. याशिवाय यातील अपूर्वाने साकारलेली सिंड्रेलाही तितकीच लोभस वाटेल.. एकूणच प्रत्येक कलाकारानं आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाय. त्यामुळे एका चांगल्या टीममुळे हे नाटक करणं अधिक सोपं गेलंय..
कॉमेडी नाटक, कॉमेडी सिनेमा आणि छोट्या पडद्यावरील एखादं कॉमेडी स्कीट यांत काय फरक जाणवतो? या तिन्ही माध्यमात आपण काम केलंय.. कोणतं माध्यम अधिक जवळचं आणि प्रभावी वाटतं..?
4कलाकार हा रंगमंचावर चांगला अभिनय करू शकतो. कारण प्रेक्षक त्याला लाइव्ह बघत असतो. तिथे रिटेकची संधी नसते. जे काही केलं तेच अंतिम असतं. दररोज नवनवीन प्रयोग असतात. त्यामुळं त्याला दररोज काही तरी वेगळं करण्याची संधी मिळते. रसिकांशी कलाकाराला थेट कनेक्ट होता येतं, ते फक्त नाटकांमुळंच. त्यामुळं नाटक हे अतिशय प्रभावी माध्यम असं मला वाटतं.
थिएटरवर काम केलेला कलाकार कोणत्याही माध्यमात काम करू शकतो. मात्र, तेच सिनेमा आणि टीव्ही कलाकार रंगभूमीवर तितक्याच ताकदीने काम करू शकतात का?
4गेल्या काही दिवसांपासून एक नवा ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजे प्रसिद्ध चेहऱ्यांना घेऊन नवनवीन नाटकं येत आहेत.. नाट्यरसिकही आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी नाट्यगृहात येतो.. मात्र, नाटकाची मूळ कथा रसिकाला भावते का, हा प्रश्नही उरतो.. नाटकांत प्रसिद्ध चेहरा असल्यामुळं ते नाटक हिट ठरतं असं मला वाटत नाही. जर असं असतं तर सैराटसारखा सिनेमा इतका तुफान हिट ठरला नसता.. सैराटच्या कलाकारांनी सिद्ध केलंय की कथा हाच हिरो असतो.. मग तो सिनेमा असो किंवा मग नाटक. दोन्ही माध्यमं वेगळी असली, तरी कथा चांगली असेल तर रसिकांचा प्रतिसादही मिळतोच.. माझ्या नाटकात मी नवनवीन चेहरे घेतो.. प्रसिद्ध चेहऱ्यांना घेऊन नाटकं हिट करण्यात माझा तरी विश्वास नाही..
सध्या नाटकं खूप येतात.. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.. मात्र, जेवढी सिनेमांची चर्चा होते. तेवढी नाटकांची होते असं वाटतं का.. जर नसेल तर कुठे खंत वाटते का?
4खरंय, नाटकं पाहिजे तशी रसिकांपर्यंत पोहोचत नाहीत, हा तुमचा मुद्दा पटतोय.. कारण नाटकाला लागणारं कमी बजेट, नाट्यगृहामुळे थोडा तोटा सहन करावा लागतो. रसिकांचा प्रतिसाद नाटकांसाठी खूप खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे.
आलाय मोठा शहाणानंतर संतोष पवार पुढे काय करणार?
4सध्या कॉमेडी रसिकांना पाहायला आवडतं. धकाधकीच्या जीवनात चार क्षण आनंदाचे आणि मनोरंजानाचे रसिकांना हवे असतात. मात्र, रसिकांना हसवण्यासाठी कमरेखालचे विनोद केले जातात. हे मुळात चुकीचं आहे. कलाकारांची किंमत ही अभिनयावरून कळते. उगाच काही तरी केलं आणि हसवलं, कॉमेडी केली, अभिनय केला असं होत नाही. त्यामुळं विनोदाच्या मर्यादा जपत नवनवीन चांगली चांगली दर्जेदार नाटकं देत राहण्याचा मानस आहे.
4हॉलीवूड, बॉलीवूड, टीव्ही अन् मराठी चित्रसृष्टीच्या रंजक बातम्या व गॉसिप वाचण्यासाठी लॉगइन करा